गडचिरोलीतील 32 हत्तींचा कळप गोंदियात दाखल
नवेगाव बांध परिसरात शेतपिकांचे मोठे नुकसान गोंदिया, 18 एप्रिल (हिं.स.) :गडचिरोलीतील 32 जंगली हत्तींचा कळप सध्या गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव बांध वनपरिक्षेत्रात मुक्कामी असून, परिसरातील मका, भात आणि मोहफुलांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत
हत्तीच्या कळपाचे संग्रहित छायाचित्र


नवेगाव बांध परिसरात शेतपिकांचे मोठे नुकसान

गोंदिया, 18 एप्रिल (हिं.स.) :गडचिरोलीतील 32 जंगली हत्तींचा कळप सध्या गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव बांध वनपरिक्षेत्रात मुक्कामी असून, परिसरातील मका, भात आणि मोहफुलांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

या कळपात 23 मोठे हत्ती आणि 9 पिल्लांचा समावेश असून, मागील 8 दिवसांपासून ते या परिसरातच थांबले आहेत. मक्याच्या आणि भाताच्या शेतीसह मोहफुलांची उपलब्धता असल्याने हत्ती या भागात स्थिरावले आहेत. गोठणगाव रेंजमध्ये दिवसा हत्ती पाहण्यासाठी जमलेल्या गावकऱ्यांमध्ये अचानक हालचाली झाल्याने पळापळ झाली. या घटनेत दोन ते तीन ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले आहेत. वन विभागाने नागरिकांना हत्तींना जवळ न जाण्याचे आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

‘एमई-थ्री’ हत्तीपासून विशेष सावधगिरी

वन विभागाने कळपातील “एमई-थ्री” नावाच्या आक्रमक हत्तीबाबत विशेष इशारा दिला आहे. हा हत्ती यापूर्वी भामरागड आणि सिरोंचा परिसरात मानवी हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याने त्याच्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वन विभागाने थर्मल ड्रोन, 15 ते 20 कर्मचारी आणि शीघ्र कृती दल तैनात केले असून, हत्तींच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे. स्थानिक सरपंच, पोलिस पाटील आणि अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून दररोज हत्तींच्या हालचालींची माहिती दिली जात आहे.

नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू

वन विभागानुसार, शेतीपिकांचे पंचनामे करून साधारण 30 दिवसांत नुकसानभरपाई दिली जाते. गेल्या 31 मार्चपर्यंत 50 ते 55 शेतकऱ्यांना सुमारे 11 लाख 20 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सध्या या हत्तींच्या कळपाच्या स्थलांतराची शक्यता कमी आहे. नैसर्गिक अधिवासातील बदल, खाणकाम, आणि अन्न-पाण्याची उपलब्धता यामुळे हे हत्ती महाराष्ट्रातील जंगलांकडे आकर्षित होत असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी रात्री शेतात न जाण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत हत्तींना डिवचू नये, अन्यथा जीवितहानीचा धोका संभवतो, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande