“निदा खानच्या विरोधात आंतरिक अधिकृत तक्रार नव्हती”- टीसीएस
नाशिक प्रकरणी कंपनी व्यवस्थापनाकडून निदाचा बचाव नाशिक, 18 एप्रिल (हिं.स.) : आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक युनिटमध्ये लैंगिक छळ आणि धर्मांतरणाच्या गंभीर आरोपांप्रकरणी पोलिस तपास सुरू असताना, कंपनीने
नाशिक येथील धर्मांतरण रॅकेटची फरार आरोपी निदा एजाज खान


नाशिक प्रकरणी कंपनी व्यवस्थापनाकडून निदाचा बचाव

नाशिक, 18 एप्रिल (हिं.स.) : आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक युनिटमध्ये लैंगिक छळ आणि धर्मांतरणाच्या गंभीर आरोपांप्रकरणी पोलिस तपास सुरू असताना, कंपनीने निदा खानचा बचाव केला आहे. निदा खानच्या विरोधात आम्हाला आंतरिक स्तरावर कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झाली नसल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले. तसेच निदा खान एचआर मॅनेजर पदावर नसल्याचे देखील टीसीएसकडून सांगण्यात आले.

टीसीएसने या प्रकरणाच्या पारदर्शक तपासासाठी एक देखरेख समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच अंतर्गत चौकशी प्रक्रियेत बाह्य संस्थांचाही समावेश करण्यात येणार आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, संचालक मंडळातील स्वतंत्र संचालक केकी मिस्त्री हे या समितीचे अध्यक्ष असतील. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) आरती सुब्रमण्यन यांच्या नेतृत्वाखालील अंतर्गत चौकशी अहवाल देखरेख समितीकडे सादर केला जाईल असे सांगितले. तसेच, निदाच्या कुटुंबियांनी दिलेल्या वक्तव्याप्रमाणेच तंतोतंत विधान करत कंपनी व्यवस्थापनाने सांगितले की, निदा खान ही एचआर मॅनेजर नव्हती. तर निदाकडे प्रोसेस असोसिएट म्हणून जबाबदारी आहे आणि तिने कधीही नेतृत्वाची भूमिका पार पाडलेली नाही.

नाशिक येथील टीसीएसमधील एका महिला कर्मचाऱ्याने सहकर्मी दानिश शेख याच्यावर 2022 मध्ये लग्नाचे खोटे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप केल्यानंतर हे प्रकरण पुढे आले. संबंधित व्यक्ती आधीपासून विवाहित असल्याचेही समोर आले आहे. पोलिस अहवालानुसार, निदा खान ही दानिश शेखची बहीण असून, तिने फिर्यादीच्या धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. याशिवाय, निदा खान आणि तौसीफ अख्तर यांनी दानिश शेख आधीच विवाहित असल्याची माहिती लपवली, असेही म्हटले जात आहे. पोलिस तपास सुरू झाल्यानंतर आणखी सात महिलांनी पुढे येत मानसिक आणि लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की वरिष्ठ सहकाऱ्यांनी त्यांचा छळ केला आणि विभागाने त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले.फेब्रुवारी 2022 ते मार्च 2026 दरम्यान या घटना घडल्याचा आरोप असून, सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर गेल्या 22 दिवसांपासून निदा खानफरार असून तिने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande