संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जर्मनीच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार
नवी दिल्ली, 19 एप्रिल (हिं.स.)संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 21 ते 23 एप्रिल या कालावधीत जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस पिस्टोरियस आणि इतर वरिष्ठ सरकारी नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आ
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह


नवी दिल्ली, 19 एप्रिल (हिं.स.)संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 21 ते 23 एप्रिल या कालावधीत जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस पिस्टोरियस आणि इतर वरिष्ठ सरकारी नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

चर्चेमध्ये, संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवणे, लष्करी संबंध अधिक दृढ करणे, तसेच सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधील संधीचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. दोन्ही संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत संरक्षण औद्योगिक सहकार्य आराखडा आणि संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेतील प्रशिक्षणासाठी सहकार्यासंबंधी अंमलबजावणी करारावर या दौऱ्यात स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

संरक्षण क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या सहकार्य उपक्रमांचा आढावा घेण्याची, तसेच उभय देशांच्या संरक्षण उद्योगांमध्ये सहयोगाचे नवीन पर्याय शोधण्याची संधी या भेटीमुळे उपलब्ध होईल. 'मेक-इन-इंडिया' उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि सह-उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने, राजनाथ सिंह जर्मनीच्या संरक्षण उद्योगातील प्रमुख प्रतिनिधींशी संवाद साधतील, अशीही अपेक्षा आहे.

संरक्षण मंत्र्यांचा हा दौरा सात वर्षांनी होत आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2019 तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी जर्मनीला भेट दिली होती. नंतर, बोरिस पिस्टोरियस यांनी जून 2023 मध्ये भारतात येऊन राजनाथ सिंह यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती.

भारत आणि जर्मनी यांच्यात लोकशाहीची मूल्ये, कायद्याचे राज्य आणि नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रती असलेली सामायिक वचनबद्धता यांवर आधारित भक्कम आणि बहुआयामी धोरणात्मक भागीदारी आहे. अलीकडच्या काळात, संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य हा या भागीदारीचा महत्त्वपू्ण आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, तसेच प्रादेशिक आणि जागतिक शांतता, स्थिरता व समृद्धीमध्ये योगदान देणे हा या भेटीचा उद्देश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande