
नवी दिल्ली , 19 एप्रिल (हिं.स.)। स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजांना अडवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. इराणच्या नौदलाने ‘भाग्य लक्ष्मी’सह दोन भारतीय टँकरांना पुढे जाण्यापासून रोखले, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले.
माहितीनुसार, ‘भाग्य लक्ष्मी’ नावाचा भारतीय ध्वजधारी टँकर होर्मुजमधून जाण्याचा प्रयत्न करत असताना इराणी नौदलाने त्याला परवानगी नाकारली. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी रेडिओद्वारे संपर्क साधून मार्ग देण्याची विनंती केली, मात्र त्यांना तातडीने मागे फिरण्याचे आदेश देण्यात आले. एका व्हिडिओमध्ये क्रू सदस्य म्हणताना ऐकू येतो की, “आम्ही स्पष्टपणे ऐकत आहोत”, तर प्रत्युत्तरात इराणी नौदलाने जहाजाला त्वरित परत जाण्यास सांगितले.
याचदरम्यान ‘सैनमार हेराल्ड’ नावाच्या आणखी एका तेलवाहू टँकरकडूनही संकटाचा संदेश मिळाला. जहाजावरील एका सदस्याने सांगितले की, सुरुवातीला त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती, पण नंतर अचानक गोळीबार सुरू झाला आणि त्यांना परत जाण्यास सांगण्यात आले.या घटनेनंतर भारताने जहाजे आणि नाविकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, इराण यापूर्वीही भारताकडे जाणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मदत करत आला आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणचे राजदूत यांची भेट घेऊन भारताची चिंता व्यक्त केली आणि भारतीय जहाजांसाठी सुरक्षित मार्ग लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. इराणच्या राजदूतांनी भारताची भूमिका त्यांच्या सरकारपर्यंत पोहोचवली जाईल, असे आश्वासन दिले.
इराणचे वरिष्ठ प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी सांगितले की, भारत आणि इराण यांचे संबंध मजबूत आहेत आणि या प्रकरणावर तोडगा काढला जाईल. मात्र, या घटनेची माहिती नसल्याचेही त्यांनी नमूद केले. नंतर इराणच्या सैन्याने जाहीर केले की, होर्मुज सामुद्रधुनी आता कडक नियंत्रणाखाली आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने इशारा दिला की, या भागात येणाऱ्या जहाजांकडे शत्रूला पाठिंबा देणारे म्हणून पाहिले जाऊ शकते आणि त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode