
बीड, 02 एप्रिल (हिं.स.)। आष्टी तालुक्याची 'कामधेनू' असा लौकिक असलेला आणि अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेला कडा WAN सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या या आशादायी चित्राला गालबोट लावणारी एक अत्यंत धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कारखान्याच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असतानाच, आवारातून तब्बल कोट्यवधी रुपयांच्या मशिनरीची चोरी झाली आहे. या प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, लवकरच याप्रकरणी पोलिसांत रीतसर गुन्हे दाखल केले जातील असा मोठा गौप्यस्फोट माजी आ. भीमराव धोंडे यांनी केला आहे.
माजी आ.धोंडे यांनी महेश कारखान्याच्या उभारणीचा, आतापर्यंत आलेल्या संकटांचा आणि सद्यस्थितीचा सविस्तर आढावा पत्रकारांसमोर दिला.
महेश सहकारी साखर कारखाना ही या भागातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्ही आतापर्यंत अनेक संकटे झेलली आहेत. आता या चोरीच्या प्रकाराने आम्ही अजिबात खचणार नाही. आमचा निर्धार पक्का असून, कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या हंगामात गाळप सुरू करून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करूच असा विश्वास माजी आ. भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला आहे.
माजी आ.धोंडे यांनी माहिती देताना सांगितले, आष्टी आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व स्थानिक अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी महेश सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला. या कारखान्याचे काम अत्यंत वेगात आणि सकारात्मक वातावरणात सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी कारखान्याच्या महागड्या मशिनरीवर डल्ला मारल्याची गंभीर बाब माजी आ. धोंडे यांनी उघड केली. ही चोरी काही हजारांची नसून थेट कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis