लातूरात अवैध दारू विक्री व हातभट्टीवर कारवाई; 90 हजारांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 20 एप्रिल (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी धडक कारवाई करत एकूण ₹89,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई लातूर ग्रामीण उपविभागात करण्या
पोलीस कारवाई


लातूर, 20 एप्रिल (हिं.स.)।

लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी धडक कारवाई करत एकूण ₹89,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई लातूर ग्रामीण उपविभागात करण्यात आली.

पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या देशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी सुमारे 9.15 वाजता छापा टाकण्यात आला. या कारवाईत गोविंद दिगंबर खोसे (वय 38, रा. माटेफळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 90 एमएलच्या 70 सिलबंद देशी दारूच्या बाटल्या, किंमत ₹3,500 जप्त करण्यात आल्या.

त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. यात मलकू विठोबा पवार (वय 47, रा. तुकाई नगर, मुरुड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले सुमारे 1200 लिटर आंबट रसायन तसेच 20 लिटर गावठी दारू असा एकूण ₹86,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुने घेऊन उर्वरित रसायन व दारू जागीच नष्ट करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात प्रमोद देशमुख, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, पाराजी पुठ्ठेवाड, प्रदीप चोपणे तसेच मुरुड पोलीस ठाण्याचे हिंगमीरे आणि बाबासाहेब खोपे यांचा समावेश होता. दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande