आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात परभणीचा समावेश; शासन निर्णय जारी, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात
परभणी, 20 एप्रिल (हिं.स.)। राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत, शासनाने परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात समावेश केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. याबाबतचा शासन
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात परभणीचा समावेश; शासन निर्णय जारी, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात


परभणी, 20 एप्रिल (हिं.स.)।

राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत, शासनाने परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात समावेश केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या नियोजन विभागाने जारी केला आहे. केंद्राच्या नीति आयोग मार्फत सुरू झालेल्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाने देशातील मागास जिल्ह्यांच्या विकासात प्रभावी भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही या संकल्पनेचा विस्तार करत परभणीसह सहा नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर या शासन निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात झालेला समावेश हा विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा आणि गती मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हयात आरोग्य, शिक्षण, शेती व जलसंपदा, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत ठोस बदल घडवले जातील. प्रत्येक नागरिकांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचवणे, युवकांना रोजगाराची संधी देणे आणि ग्रामीण भागाला बळकटी देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. हा निर्णय परभणीच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच मोलाचा ठरेल.”पाच प्रमुख क्षेत्रांवर भर - या कार्यक्रमातंर्गत परभणी जिल्ह्यात आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषि व संलग्न सेवा, मूलभूत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. या क्षेत्रांतील कामगिरी 49 प्रमुख निर्देशकांच्या आधारे मोजली जाणार असून, त्यानुसार जिल्ह्याचा दर्जा ठरविला जाईल.तालुका स्तरावरही विकासाला गती - आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या विस्तारातही परभणी जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, परभणी, सेलू, सोनपेठ, मानवत, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला विशेष गती मिळणार आहे. या अंतर्गत आरोग्य, शिक्षण, शेती व संलग्न सेवा, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांत ठोस सुधारणा केल्या जातील.निधी व योजनांना प्राधान्य - या समावेशामुळे परभणी जिल्ह्यास राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांमधून प्राधान्याने निधी मिळणार आहे. या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यात पायाभूत सुविधा उभारणी, कृषी विकास, आरोग्य सेवा सुधारणा, शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांत ठोस बदल घडून येणार आहेत.एकूणच, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात समावेश झाल्याने परभणी जिल्ह्यासाठी विकासाचे नवे दार खुले झाले असून, येत्या काळात जिल्हा प्रगतीच्या नव्या उंचीवर झेप घेईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande