डोंबिवलीतील ५२ चाळ मैदानातील सुशोभित जागेवर रेल्वे प्रशासनाची कारवाई; नागरिकांमध्ये नाराजी
डोंबिवली, 20 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम विभागातील ५२ चाळ मैदान परिसरात कथित अतिक्रमण झाल्याचा दावा करत रेल्वे प्रशासनाने सोमवारी सकाळी कारवाई करत सुशोभित करण्यात आलेल्या जागेवर हातोडा चालवला. काही वर्षांपूर्वी कचरा आणि अस्वच्छतेने भरलेली ही जागा स्था
Photo2


Photo1


डोंबिवली, 20 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम विभागातील ५२ चाळ मैदान परिसरात कथित अतिक्रमण झाल्याचा दावा करत रेल्वे प्रशासनाने सोमवारी सकाळी कारवाई करत सुशोभित करण्यात आलेल्या जागेवर हातोडा चालवला. काही वर्षांपूर्वी कचरा आणि अस्वच्छतेने भरलेली ही जागा स्थानिक नागरिकांच्या वापरासाठी सुंदर बागेसारखी विकसित करण्यात आली होती.

मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी स्वतःच्या खर्चाने या परिसराचे सुशोभीकरण केले होते. पूर्वी दारूच्या पार्ट्या आणि कचऱ्यामुळे ओळखली जाणारी ही जागा त्यांनी हिरवळ, बसण्याची सोय, पथदिवे आणि फिरण्यासाठी योग्य अशी आकर्षक जागा म्हणून विकसित केली होती. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ स्थानिक नागरिक येथे मॉर्निंग वॉक आणि विरंगुळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत होते.

मात्र रेल्वे प्रशासनाने ही जागा त्यांच्या मालकीची असल्याचा दावा करत अतिक्रमण झाल्याचे सांगून कारवाई केली. यावेळी प्रल्हाद म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सोयीचा विचार करण्याची विनंती केली. परंतु रेल्वे प्रशासनाने ही जागा विकसित करताना अधिकृत परवानगी घेणे आवश्यक होते, असे स्पष्ट करत कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगितले.

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधींची अपेक्षा आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे.

दरम्यान, काही नागरिकांनी या कारवाईनंतर “सुंदर बागेचा भस्मासुर झाला” अशा शब्दांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande