
* शेती आणि पिकांवर रोगराईचं सावट
बुलढाणा, २० एप्रिल (हिं.स.) : यंदाच्या भेंडवळाच्या घटमांडणीच्या भाकितानुसार पावसाची स्थिती चढ-उताराची राहणार आहे. पावसाचे चार महिने कसे असतील, याची माहितीही समोर आली आहे पावसाचा पहिला महिना अत्यंत कमी पावसाचा असेल. यामुळे सुरुवातीच्या पेरण्यांना विलंब होऊ शकतो किंवा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. दुसऱ्या महिन्यात पाऊस साधारण स्वरूपाचा राहील, ज्यामुळे पिकांना उभारी मिळेल.
पिकांबाबत यंदाचं भाकीत शेतकऱ्यांची चिंता वाढवणारं असून, ज्वारी, उडीद आणि तूर ही पिकं सर्वसाधारण येतील, मात्र त्यांच्यावर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तांदूळ, जवस आणि तीळ ही पिकं मात्र समाधानकारक येतील. एकूणच, निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पिकांच्या हानीचे संकेत भविष्यवाणीतून वर्तवण्यात आले.
देशाच्या संरक्षणाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'करडी'चे दाणे घटाबाहेर पसरलेले आढळले. याचा अर्थ आगामी काळात देशाचे संरक्षण खाते अडचणीत राहण्याची शक्यता आहे. तसेच, मांडणीतील 'कारंजी' फुटलेली आढळल्याने देशाच्या आर्थिक स्थितीवर ताण येण्याचे आणि अर्थव्यवस्था काहीशी ढासळण्याचे संकेत देण्यात आले.
यावर्षीच्या घटमांडणीत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घटावर ठेवलेली 'पुरी' गायब झाली आहे. इथं 'पुरी' ही पृथ्वीचं प्रतीक असून, पुरी गायब होणं हे भविष्यात येणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत आहेत, असे भाकीत तज्ज्ञांनी वर्तवलं.
गेल्या ३५० वर्षांपासून शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती भेंडवळची घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी आज, सोमवारी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीचे निष्कर्ष जाहीर केले.
शेती आणि पीकस्थिती
शेतीच्या दृष्टीने हे वर्ष मिश्र स्वरूपाचे राहील, असे संकेत आहेत. काही पिकांना चांगले उत्पादन मिळेल, तर काही पिकांवर नैसर्गिक संकटांचे सावट राहू शकते. कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांसाठी मध्यम स्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अर्थकारण आणि बाजारपेठ
भविष्यवाणीनुसार महागाईत चढ-उतार दिसू शकतो. काही वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी बाजारपेठ स्थिर राहील. व्यापार क्षेत्रात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राजकारण आणि सामाजिक स्थिती
राजकीय पातळीवर काही अनपेक्षित घडामोडी घडण्याचे संकेत देण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते, तसेच सामाजिक पातळीवर तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
घटमांडणी नेमकी कशी करतात?
भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे. शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये मांडली जातात. घटाच्या वर्तुळाकार अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्ये मांडली जातात.
यंदाच्या गट मांडणीतून निघालेले प्रमुख निष्कर्ष -
पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल.
कापूस, तांदूळ पिकाचे उत्पन्न भरपूर.
ज्वारी, तूर, मुंग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील.
तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल.
देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल
राजा कायम असेल...
देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही.
पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलै सर्वसाधारण, ऑगस्ट, सप्टेंबर कमी असेल...
अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी