डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला
डोंबिवली, 20 एप्रिल (हिं.स.)। मध्य रेल्वेचे गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली स्थानकात सकाळी फलाट क्रमांक एक वर लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला. परिणामी मुंबईकडे व कल्याणकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. आठवड्याच्या पहिल्याच सोमवारी या
Photo1


डोंबिवली, 20 एप्रिल (हिं.स.)। मध्य रेल्वेचे गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली स्थानकात सकाळी फलाट क्रमांक एक वर लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला. परिणामी मुंबईकडे व कल्याणकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. आठवड्याच्या पहिल्याच सोमवारी या घटनेमुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास झाला. दरम्यान काही लोकल गाड्या रद्द झाल्याने स्थानकात तोबा गर्दी झाली.

सोमवारी सकाळी डोंबिवली स्थानकात रेल्वे फलाट क्रमांक एक वर कळवा कारशेडमधून येणारी रिकामी लोकल ट्रेन जात असता ती रेल्वेट्रकवरून घसरून खाली उतरली. परिणामी या घटनेने काही काळ रेल्वे सेवा कोलमडून पडली आणि स्थानकात गर्दी झाली. मात्र फास्ट ट्रॅकवरील रेल्वे वाहतूक सुरळीत होती. डोंबिवली स्थानकात ट्रेनचा एक डबा रुळावरुन खाली घसरला. ही ट्रेन रिकामी असल्याने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र यामुळे इतर लोकल ट्रेनचा खोळंबा झाला.

रिक्षा चालकांचा उद्दामपणा : स्थानकात रेल्वे ट्रेन घासल्याने काही लोकांनी कल्याण व दिवा येथे ज्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून रिक्षाने जाण्याचे ठरविले. मात्र पूर्व व पश्चिम विभागातील रिक्षा चालकांनी इच्छुक प्रवाश्यांना दाद दिली नाही. इच्छुक प्रवाश्यांना रिक्षा चाल उडवाउडवीची उत्तरे देत होते अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. यामध्ये महिला, ज्येष्ठ लोकांचे खूप हाल झाले.

घटनेची तातडीने चौकशी व्हावी

या रेल्वे घटनेबाबत भाजपा नगरसेवक दिपेश पुंडलिक म्हात्रे म्हणाले की, डोंबिवली प्लॅटफॉर्म क्र. 1 येथे लोकल गाडी रुळावरून घसरणे, ही सुरक्षेच्या बाबतीतली एक गंभीर चूक (अपयश) आहे. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु या घटनेमुळे शेकडो प्रवाशांचा जीव सहजपणे धोक्यात येऊ शकला असता. वारंवार तक्रारी करूनही प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मध्य रेल्वेकडून स्पष्टपणे निष्काळजीपणा केला जात असल्याचे दिसून येते. या घटनेची तातडीने चौकशी होणे आणि यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करता येणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande