
रायपूर, 20 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात आज, सोमवारी भीषण विमान अपघात झाला. नारायणपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील खुर्सागढा गावाजवळ रतनपहली जंगलात हा अपघात घडला. एका डोंगराला विमान धडकल्यामुळे झालेल्या या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिकांचा मृत्यू झाल्याची प्रारंभिक माहिती पुढे आली आहे. अपघाताच्या वेळी हे विमान 30 फूट उंचीवरून उड्डाण करीत होते.
अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघातानंतर परिसरातून धुराचे लोट उठताना दिसत असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा प्रायव्हेट जेट दुर्घटनेत मृत्यू झाला होता. लँडिंगच्या प्रयत्नात असलेले विमान दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळले होते. तसेच 23 फेब्रुवारी 2026 रोजी झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथे एक एअर अॅम्ब्युलन्स कोसळली होती. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीकडे जाणारे हे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या 17 मिनिटांत कोसळले होते. त्यात रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी आणि क्रू सदस्य होते. दरम्यान छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघातात 2 वैमानिकांच्या मृत्यूला दुजोरा मिळाला असला तर अपघातची विस्तृत माहिती अद्याप पुढे आलेली नाही.-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी