
परभणी, 20 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करणाऱ्या बांधकाम कामगार लाभार्थ्यांच्या निवडीसाठी १५ मे रोजी पाथरी येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राजेश विटेकर यांनी दिली.
पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी (पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी) बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून, या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून राजेश विटेकर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. मंडळाच्या निर्देशानुसार समितीमार्फत नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध लाभांच्या अर्जांची छाननी व निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याच अनुषंगाने समितीची पहिली बैठक परभणी येथील जिल्हा बांधकाम अधिकारी कार्यालयात पार पडली.
पाथरी विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांच्या अंतिम निवडीसाठी १५ मे रोजी पाथरी येथे समितीची मंजुरी बैठक होणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी निकाली काढावेत, तसेच या योजनेचा लाभ घ्यायचा असलेल्या इच्छुकांनी १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहनही विटेकर यांनी केले आहे. या बैठकीस समितीचे अध्यक्ष राजेश विटेकर, सदस्य सचिव तात्याराव कराड, सदस्य विकास वडकर, रवी परांडे, रागिणी गोपाल सुरवसे, विठ्ठल घाडगे तसेच नोंदणी अधिकारी सौदागर, पारखे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis