
पुणे, 20 एप्रिल (हिं.स.)पॉस प्रणाली व प्रत्यक्षात असलेल्या युरिया साठ्यामध्ये तफावत आढळल्याने जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांना निलंबन कालावधीत सर्व प्रकारच्या खतविक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी निलंबित केलेल्या विक्रेत्यांकडून खते न घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. परवाना निलंबित करण्यात आलेल्या दुकानदारांमध्ये सात जण दौंड तालुक्यातील आहेत.
जिल्ह्यातील युरिया खताच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून जिल्ह्यातील विक्रेत्यांची १ एप्रिलपासून युरिया खताचा पॉस मशीनवरील साठा व प्रत्यक्षात विक्री केंद्रातील साठा याची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेमध्ये ३५०० टन युरिया खताचा साठा पॉस प्रणालीवरून कमी करण्यात आलेला आहे. यामुळे खरीप हंगामात खताची वस्तुनिष्ठ उपलब्धता व पुरवठा नियोजन करण्यास जिल्हा कार्यालयास मदत होणार आहे. खतविक्रेत्यांना अनेकदा संधी देऊनही वेळेत कार्यवाही न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु