उजनीतील बंधारा कोरडा, शेतकऱ्यांचा रोष उफाळला
सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)। मंगळवेढा तालुक्यातील नळी, माचनूर,अरळी भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णपणे कोरडा पडल्याने शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट कोसळले आहे. विशेष म्हणजे उजनी धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध असताना
ujani dam news


सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)।

मंगळवेढा तालुक्यातील नळी, माचनूर,अरळी भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णपणे कोरडा पडल्याने शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट कोसळले आहे. विशेष म्हणजे उजनी धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध असतानाही तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हजारो एकरांवरील उभी पिके करपण्याच्या मार्गावर असून, हा प्रश्न आता केवळ कृषीपुरता मर्यादित न राहता सामाजिक व राजकीय पातळीवरही धगधगू लागला आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असल्याने वाढलेल्या उखाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच शेतकऱ्यांना शेतीला दिल्या जाणारे पाण्याचे संकट आले आहे.

उजनी धरणात पाणी असून देखील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुर ,मंगळवेढा,मोहोळ,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील बंधाऱ्याकडे पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे “पाणी आहे, पण आमच्यासाठी नाही” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. पाण्याचे नियोजन, वितरण आणि स्थानिक गरजांचा विचार करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande