
अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.)।
महानगरपालिकेच्या सभागृहात आज विविध विषयांवर झालेल्या प्रशासनाच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचार, निविदा प्रक्रिया आणि स्वच्छता अहवालावरून जोरदार खडाजंगी झाली. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळात विकास शुल्क, नगरस्थान दलित वस्ती आणि मनपा निधीतील कामांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले.
महापौर श्रीचंद तेजवानी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सेवानिवृत्त न्यायाधीश आणि चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश अभियंत्यांचा समावेश असलेली दोन सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले. चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी प्रस्ताव क्रमांक 33 अंतर्गत प्रशासकीय कार्यकाळातील कामांवर चर्चा उपस्थित केली. त्यांनी आरोप केला की जिल्हा नियोजन आणि शासन निधीतील कामे ऑफलाईन निविदांद्वारे देण्यात आली, तसेच नियम टाळण्यासाठी कामे तुकड्यांमध्ये विभागून मंजूर करण्यात आली. दहा लाखांवरील कामांसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया टाळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी ऑनलाइन टेंडर प्रक्रियेऐवजी ऑफलाइन पद्धतीचा अवलंब करून भ्रष्टाचारास खतपाणी घातल्याचा आरोप करत संबंधित कर्मचार्यांवर कारवाईची मागणी केली. स्वीकृत नगरसेवक प्रशांत देशपांडे यांनी या घटनांना न्यायालयापेक्षाही गंभीर असे संबोधले, तर बबलू शेखावत यांनी तत्त्कालीन आयुक्तांवर मनपाची लूट केल्याचा आरोप केला.
सभागृह नेता चेतन गावंडे यांनी पाटबंधारे विभागाचा जीआर महापालिकेला लागू केल्याबाबत प्रश्न उपस्थित करत संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली.दरम्यान, स्वच्छता समितीच्या अहवालावरूनही सभागृहात चर्चा रंगली. नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी अहवालातील त्रुटींवर कारवाई करण्याची मागणी केली, तर गुड्डु धर्माळे यांनी कंत्राटदाराने 90 दिवस उलटूनही काम सुरू न केल्याबाबत प्रशासनाला जाब विचारला याचवेळी नगरसेवक चंदू खेडकर यांनी सभागृहात एक ऑडिओ रेकॉर्डिंग सादर करत संबंधित अधिकार् यावर सदस्यांवर दवाव टाकल्याचा आरोप केला. एका दिवसात 60 फोन आल्याचा दावा करत त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली. यावर महापौर तेजवानी यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.सभागृहातील या सर्व घडामोडींमुळे मनपा प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह सम निर्माण झाले असून पुढील चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी