

रायगड, 20 एप्रिल (हिं.स.): तालुक्यातील भायमाला (कामार्ले) येथील वरदविनायक महिला स्वयंसहायता समूह बचतगटाने कष्ट, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर स्वावलंबनाकडे उल्लेखनीय वाटचाल केली आहे. २७ मार्च २०१८ रोजी समूहाला १५ हजार रुपयांचा फिरता निधी मिळाला. समूहातील महिलांनी हा निधी २ टक्के व्याजदराने परस्पर वाटून घेत नियमित परतफेड केली आणि समूहाची आर्थिक शिस्त मजबूत केली.
यानंतर समूहाला १ लाख रुपयांचे कर्ज मिळाले. या भांडवलाचा उपयोग करून महिलांनी मसाले, विविध सरबते, लोणची आणि कॉपर मिनाकारी उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. समूहाच्या अध्यक्षा स्मिता वैद्य यांनी मिनाकारीचे प्रशिक्षण घेत इतर सदस्यांनाही कौशल्य विकसित करून दिले. त्यामुळे महिलांनी तांब्याच्या वस्तूंवर आकर्षक मिनाकारी करून विक्रीतून उत्पन्न वाढवले.
समूहाने रायगड सरस, कोकण सरस आणि महालक्ष्मी सरस यांसारख्या प्रदर्शनांत सक्रिय सहभाग घेतला. कोकण सरस २०१९ मध्ये समूहाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले. सध्या समूहात १० सदस्य असून त्यापैकी ७ सदस्य दारिद्र्यरेषेखालील आहेत. नियमित बचत आणि व्यवसायातून महिलांनी आर्थिक स्थैर्य साधले आहे.
भविष्यात अलिबाग-मुंबई महामार्गालगत स्वतःचे आउटलेट सुरू करण्याचा समूहाचा मानस आहे. तसेच उमेद अभियानांतर्गत उत्पादने जिल्हास्तरावर पोहोचवण्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनामुळे या समूहाच्या प्रगतीला अधिक बळ मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)