
लातूर, 20 एप्रिल (हिं.स.)।
: औसा शहरात
नकली सोने विक्री करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला असून या प्रकरणात तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना औसा येथील जुने बस स्थानक परिसरात घडली. अमर बसवराज रडडे (वय २६ वर्षे रा. केवळराम गल्ली औसा) हे कुमारस्वामी महाविद्यालयात नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते विजय जनरल स्टोअर्सकडे जवळ तीन अनोळखी व्यक्ती जात असताना त्यांच्या आल्या. त्यांनी स्वतःकडे सोन्याचे बिस्कीट व अंगठी असल्याचे सांगून कमी दरात विक्री करण्याची ऑफर दिली.
संशयितांपैकी एका व्यक्तीने गुलाबी कागदात गुंडाळलेले दोन पिवळ्या रंगाचे धातूचे बिस्कीट आणि एक अंगठी दाखवली. त्यांनी एक बिस्कीट पाच तोळे असून त्याची किंमत २ लाख ५० हजार रुपये तर एक तोळ्याची अंगठी ५० हजार रुपयांना देण्याची तयारी दर्शवली. मात्र पावती देण्यास नकार दिल्यामुळे अमर रडडे यांना संशय आला. यावेळी
त्यांनी तत्काळ औसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाउसाहेब माळवदकर यांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपींना बोलण्यात गुंतवून ठेवण्याचे सांगितले. काही वेळातच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान आरोपींची नावे केरवा सुर्यभान जाधव (वय ७० वर्षे रा. सलगरा बु. जि. लातूर), केशव छगन जाधव (वय ५० वर्षे रा. दहिटणे जि. जालना) सध्या शिवनी बु. ता. औसा आणि गोवर्धन गणपत गोरे (वय ४० वर्षे रा. नूर कॉलनी जि. बीड) अशी समोर आली.
पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत दोन पिवळ्या रंगाचे धातूचे बिस्कीट व एक अंगठी जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपींनी सदर वस्तू नकली असल्याची कबुली देत नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने आणल्याचे सांगितले.
या घटनेमुळे कमी दरात सोने देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. अमर रडडे यांच्या जागरूकतेमुळे मोठी फसवणूक टळली असून पोलिसांच्या तत्पर कारवाई केली. अशा प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांची त्वरित माहिती पोलिसांना दिल्यास गुन्हे रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis