परभणीत रस्त्याची काम संथ गतीने; खड्ड्यांमुळे अपघातात वाढ
परभणी, 20 एप्रिल (हिं.स.)। मानवत ते पाळोदी मार्गावरील रस्ता विकास कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानक ते रोडे कॉलनी दरम्यानचे काम मागील सहा महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असून, यामुळे या मार्गावर अपघातांची
परभणीत रस्त्याची काम संथ गतीने; खड्ड्यांमुळे अपघातात वाढ


परभणी, 20 एप्रिल (हिं.स.)। मानवत ते पाळोदी मार्गावरील रस्ता विकास कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानक ते रोडे कॉलनी दरम्यानचे काम मागील सहा महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असून, यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मार्चअखेरमुळे काम काही काळ ठप्प झाले असले तरी एप्रिल महिन्यातही कामाचा वेग वाढलेला दिसत नाही. उन्हाचा पारा चढत असतानाही संबंधित विभाग व वरिष्ठ अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

रस्त्यावर खोदकाम करून सोडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी मोटारसायकली घसरून महिला व प्रवासी जखमी झाले असून, काहींचे हात-पाय फ्रॅक्चर झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, पुन्हा एक चारचाकी वाहन खड्ड्यात जाऊन अपघातग्रस्त झाले. सुदैवाने चालकाचा जीव वाचला. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने धाव घेऊन चालकाला बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. हा मार्ग ग्रामीण भागातून मानवत शहरात येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, अनेक खेड्यांचा संपर्क याच रस्त्याने आहे. तरीही काम अर्धवट ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संबंधित कंत्राटदार व प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande