
पिंपरी, 20 एप्रिल (हिं.स.)पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या पहिल्या उपनगराध्यक्षा श्रीमती शांताबाई सुदाम सातव (वय ८७ वर्षे) यांचे रविवारी पिंपरी गावातील राहत्या घरी निधन झाले. राष्ट्र सेवा दलात त्यांनी अनेक वर्षे सक्रिय काम केले. पिंपरी चिंचवड नगरपालिका स्थापनेनंतर तत्कालीन खासदार आण्णासाहेब मगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम नगराध्यक्ष डॉ. श्री श्री घारे यांच्या बरोबर शांताबाई सातव यांनी उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. निगडी रुपी नगर पाणी पुरवठा प्रश्नासाठी झालेल्या आंदोलनात त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. तसेच राष्ट्र सेवा दलात माजी मंत्री भाई वैद्य, मृणाल गोऱ्हे, निळू फुले यांच्या समवेत सक्रिय सहभाग घेऊन काम केले. त्यांनी महागाई विरोधात अनेक आंदोलने केली. एस. टी. भाडेवाढ विरोधात चिंचवड स्टेशन येथे रास्ता रोको आंदोलनात एस. टी. पुढे आडवे झोपून वाहतूक बंद केली. खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब मुलांना नगरपालिकेकडून विशेष अनुदान मिळवून देण्यात शांताबाई सातव यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच आळंदी देवस्थान वारकरी शिक्षण संस्थाना विशेष मदत मिळवून दिली. पिंपरी गावातील जिजामाता रुग्णालयाचे भूमिपूजन त्यांच्या काळात झाले होते. चिंचवड स्टेशन येथील औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेस देखील त्यांनी विशेष सहाय्य केले होते. श्रीमती शांताबाई सुदाम सातव यांच्या मागे मुलगा, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंड, पतवंड असा परिवार आहे. निवृत्त पोलिस निरीक्षक संजय सातव यांच्या त्या मातोश्री आणि पत्रकार अश्विनी सातव - डोके, उद्योजक कुणाल सातव यांच्या त्या आजी होत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु