
सोलापूर, 21 एप्रिल (हिं.स.)। राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व संलग्न संघटना सहभागी होणार नसल्याची माहिती जिल्हा शाखा सोलापूरच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र या संपाला बाहेरून पाठिंबा देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ ही मागासवर्गीयांची मान्यता प्राप्त संघटना असून, राज्य मध्यवर्ती संघटना संप पुकारताना कास्ट्राईबला विश्वासात घेत नाहीत, चर्चेसाठी आमंत्रित करत नाहीत, असा आरोप संघटनेने केला आहे. तसेच मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.विशेषतः पदोन्नतीसंबंधी मागासवर्गीयांचा महत्त्वाचा प्रश्न या संपात समाविष्ट नसल्यामुळे संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे यांनी सांगितले.दरम्यान, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सर्व सभासद व कर्मचाऱ्यांनी कोणताही संभ्रम न बाळगता २१ एप्रिल रोजी आपल्या नियमित कर्तव्यावर हजर राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड