अमरावतीत सांडपाणी, अतिक्रमण आणि बेघर निवारा केंद्राची आयुक्तांकडून पाहणी
अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.) : शहरातील विविध भागांमध्ये सांडपाणी, नालेसफाई व अतिक्रमणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्
अमरावतीत सांडपाणी, अतिक्रमण आणि बेघर निवारा केंद्राची आयुक्त वर्षा लड्डा यांची पाहणी


अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.) : शहरातील विविध भागांमध्ये सांडपाणी, नालेसफाई व अतिक्रमणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले.

सर्वप्रथम आयुक्तांनी सामरा नगर उद्यान, सामरानगर परिसराला भेट दिली. येथे स्थानिक नागरिक सचिन थोटे यांनी वारंवार मांडलेल्या सांडपाण्याच्या समस्येची त्यांनी सखोल पाहणी केली. परिसरात सांडपाणी साचत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी तातडीने निचरा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश दिले. यानंतर सामरानगर व गजराज नगर भागात म्हशीवाल्यांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या समस्यांची त्यांनी पाहणी केली. या अतिक्रमणामुळे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर त्वरित कारवाई करून अतिक्रमण हटविण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले. कोंडेश्वर रोडवरील पेट्रोल पंपासमोरील कच्च्या नालीची दयनीय अवस्था पाहून आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. येथे नाली पक्की करून सांडपाण्याचा सुरळीत निचरा होईल यासाठी आवश्यक ती कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले. तसेच मनपा उर्दू शाळा क्रमांक ११ समोरील नाल्यांची पाहणी करत त्यांनी स्वच्छतेच्या अभावामुळे निर्माण झालेल्या अडचणींची दखल घेतली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून येथे नियमित साफसफाई व दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आठवडी बाजार परिसरातील मटन मार्केट येथेही आयुक्तांनी भेट दिली. येथे अतिक्रमणामुळे नाल्यांचा प्रवाह अडथळलेला असून अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले.

या ठिकाणी अतिक्रमण हटवून नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर झोन क्र. ४ कार्यालय, बडनेरा तसेच गोपाल नगर टी-पॉइंट परिसराची पाहणी करण्यात आली. या भागातही सांडपाणी व नाल्यांच्या समस्यांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची आयुक्तांनी दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना नियमित निरीक्षण करून समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी बेघर नागरिकांसाठी चालविण्यात येणाऱ्या “आधार” निवारा केंद्राची केलेली पाहणी ही अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरते. त्यांनी केंद्रातील स्वच्छता, राहण्याची व्यवस्था, अन्नाची गुणवत्ता आणि इतर मूलभूत सुविधांची बारकाईने तपासणी करून बेघर नागरिकांच्या जीवनमानाबाबत असलेली त्यांची बांधिलकी स्पष्ट केली. फक्त पाहणीपुरते मर्यादित न राहता व्यवस्थापन अधिक करण्यासाठी त्यांनी दिलेल्या सूचनांमुळे या केंद्राच्या कार्यक्षमतेत निश्चितच सुधारणा होईल. अशा प्रकारे मानवी दृष्टिकोन ठेवून केलेले काम हे प्रशासनातील सकारात्मक बदलाचे प्रतीक असून, गरजू नागरिकांच्या जीवनात दिलासा निर्माण करणारे आहे.

या संपूर्ण दौऱ्यादरम्यान आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्पष्टपणे सांगितले की, नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत शहरातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि अतिक्रमण नियंत्रण यावर विशेष भर दिला जाईल. कोणत्याही प्रकारची हलगर्जी सहन केली जाणार नसून कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. महानगरपालिका प्रशासन शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पाहणी दरम्यान सन्मा.नगरसेवक अजय जयस्वाल, किशोर जाधव, सन्मा.नगरसेविका रजनी डोंगरे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव,, कर्मचारी, स्वास्थ निरीक्षक उपस्थित होते. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande