
लातूर, 21 एप्रिल (हिं.स.)। शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक, ज्येष्ठ बालरोगतज्ञ तसेच माजी खासदार डॉ. गोपाळरावजी पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने लातूर जिल्ह्यासह शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. पाटील यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना करून अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले. त्याचबरोबर बालरोगतज्ञ म्हणून त्यांनी हजारो बालकांवर उपचार करत समाजसेवेचे व्रत जपले.
राजकारणातही त्यांनी खासदार म्हणून काम करताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा साधेपणा, जनसामान्यांशी असलेला जिव्हाळा आणि सेवाभावी वृत्ती यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis