
लातूर, 21 एप्रिल, (हिं.स.) उन्हाळ्याच्या कडक झळा वाढत असताना पक्ष्यांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. ही गरज ओळखून प्रभुराज प्रतिष्ठाण व लातूर जिल्हा वकील मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 21 एप्रिल 2026) रोजी लातूर जिल्हा न्यायालय परिसरात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत मा. संजयजी भरूका (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश) यांच्या हस्ते झाडांना येळण्या (पाण्याची भांडी) बांधून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली. उन्हाळ्यात पाण्याअभावी पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात भटकंती होत असल्याचे लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाण्याचा अपव्यय टाळून पक्ष्यांसाठी पाणी राखून ठेवण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या छतावर किंवा अंगणातील झाडांवर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, असेही सांगण्यात आले.
या उपक्रमाला जिल्हा न्यायालयातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये न्यायाधीश नं. 1 आर. आर. भोसले, वकील मंडळाचे अध्यक्ष शिवकुमार जाधव, प्रभुराज प्रतिष्ठाणचे अँड. अजय कलशेट्टी, विशेष जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे, तसेच इतर वकील व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उन्हाच्या तीव्रतेमुळे पशुपक्ष्यांना चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण होत असताना, अशा सामाजिक उपक्रमांमुळे त्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis