
सोलापूर, 21 एप्रिल, (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कामकाज आता ६० कोटी रुपयांच्या नव्या प्रशासकीय भवनातून चालणार आहे. सध्याच्या इमारतीतील परीक्षा विभाग, प्रशासन, वित्त व लेखा विभाग, ॲडमिन असे विभाग या नव्या इमारतीत असणार आहेत. याशिवाय कुलगुरू, प्र कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रशस्त दालने नव्या इमारतीत करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यापीठासंबंधी कामासाठी विद्यार्थ्यांसह सर्वांना आता हिरज रोडवरील नव्या प्रशासकीय भवनात जावे लागणार आहे.
याशिवाय विद्यापीठाच्या आवारातील १५ संकुले देखील आहे तेथेच असतील. नवीन प्रशासकीय इमारतीत कामकाज सुरू झाल्यावर दरमहा लाखांचे वीजबिल येईल. या पार्श्वभूमीवर नवीन प्रशासकीय इमारतीवर सोलार पॅनेल उभारले जाणार असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड देखील केली जात आहे. नवीन इमारतीत परीक्षा विभागाचे कामकाज योग्य पद्धतीने चालेल, त्या ठिकाणी नियंत्रण कक्ष देखील उभारला जाणार असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड