
सोलापूर, 21 एप्रिल (हिं.स.)। निसर्ग वाचवा, पृथ्वी वाचवा' हा केवळ संदेश न राहता ती प्रत्येकाची कृती बनावी, या उद्देशाने जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून सोलापुरातील इको फ्रेंडली क्लबच्या वतीने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत शहरातील स्मृती वन उद्यान परिसरात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती क्लबच्या वतीने देण्यात आली आहे.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोलापूर महापालिका पर्यावरण विभाग, सामाजिक वनीकरण विभाग यांच्या प्रोत्साहन आणि सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला आहे. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वसुंधरेचे रक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे. स्मृती वन उद्यान हे सोलापूरचे फुफ्फुस मानले जाते, मात्र या परिसरात प्लास्टिक आणि कचरा साचण्याचे प्रमाण वाढले आहे. हा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी इको फ्रेंडली क्लबच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन श्रमदानाचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत केवळ स्वच्छताच केली जाणार नाही, तर गोळा झालेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जाणार आहे.जनजागृती आणि उपक्रमाची वैशिष्ट्येस्वच्छता मोहिमेसोबतच या ठिकाणी उपस्थित नागरिकांना 'प्लास्टिक मुक्त पर्यावरणाची' शपथ दिली जाणार आहे. सोलापूरकरांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड