


- मिशन मौसम अंतर्गत इस्रोच्या अंतराळ उपयोजन केंद्रासोबत सामंजस्य करार
मुंबई, 26 एप्रिल (हिं.स.)। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने मिशन मौसम अंतर्गत महाबळेश्वर येथील उच्च उंचीवरील मेघ भौतिकी प्रयोगशाळेत अत्याधुनिक एक्स-बँड ड्युअल-पोलरायझेशन डॉप्लर हवामान रडारचे उद्घाटन केले. एम. रविचंद्रन यांच्या हस्ते, ए. सूर्यचंद्र राव आणि सौम्या एस. सरकार तसेच आयआयटीएम आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.
पश्चिम घाटात समुद्रसपाटीपासून अंदाजे 1400 मीटर उंचीवर धोरणात्मकरीत्या बसवलेले हे रडार, आकाशातील एक हवामान डोळा म्हणून काम करेल; जो पाऊस, ढग आणि वादळ प्रणालींचा प्रत्येक्ष वेळेत मागोवा घेण्यासाठी वातावरणाचे सतत स्कॅनिंग करेल. अचानक होणारा पाऊस, धुके आणि सोसाट्याचा वारा यासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरसारख्या प्रदेशातील झपाट्याने बदलणाऱ्या स्थानिक हवामान स्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी हे रडार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. हे तंत्रज्ञान दुर्गम भूप्रदेशावरील डोंगराळ भागातील पाऊस, मान्सूनची गतिशीलता आणि सखोल अभिसरण प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले आहे.
हे रडार सातारा, पुणे आणि कोकण तसेच मुंबईच्या काही भागांमध्ये 3 तासांपर्यंतचा तत्काळ हवामान अंदाज वर्तवण्याची क्षमता अधिक सक्षम करते. 9.45 गिगाहर्ट्झ वर कार्यरत असलेले आणि भक्कम ऊर्जा-वर्धक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हे रडार, उच्च विश्वासार्हता, कमी देखभाल आणि ऊर्जा-कार्यक्षम निरंतर कार्याची सुविधा देते. याची दुहेरी-ध्रुवीकरण क्षमता ढगांच्या सूक्ष्म भौतिकशास्त्राबद्दल सखोल माहिती प्रदान करते, ज्यामध्ये पावसाची वैशिष्ट्ये, पावसाच्या थेंबांच्या आकाराचे वितरण आणि वादळाची रचना यांचा समावेश होतो. उच्च तपशील दाखवण्याच्या क्षमतेसह आणि जलद अद्ययावत चक्रांमुळे, हे रडार पावसाचे अचूक प्रमाण मोजण्यास आणि जलीय कणांच्या वर्गीकरणास मदत करते.
या प्रसंगी, प्रगत उपग्रह-आधारित हवामान उत्पादने सह-विकसित करण्यासाठी आयआयटीएम आणि इस्रोच्या अंतराळ उपयोजन केंद्रादरम्यान एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. हे सहकार्य उपग्रह आणि जमिनीवर आधारित निरीक्षणांचे एकत्रीकरण, वातावरण आणि सूक्ष्म-धूलिकण माहितीचे प्रमाणीकरण सुधारणे, अंदाजाची अचूकता वाढवणे आणि सखोल अभिसरण, वीज पडणे आणि हवामान बदलाचे परिणाम यांसारख्या क्षेत्रांतील संशोधनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करेल. तसेच, हे उपग्रह हवामानशास्त्रामधील क्षमता बांधणी आणि प्रशिक्षणास देखील मदत करेल.
हे रडार पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या क्षेत्रांमधील पूर्वसूचना प्रणाली अधिक बळकट करण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे, असे डॉ. एम. रविचंद्रन यांनी या प्रसंगी संबोधित करताना सांगितले. अत्यंत खराब हवामान स्थितीसाठी वेळेवर सतर्कतेचा इशारा जारी करणे आणि स्थानिक समुदाय तसेच पर्यटकांची सुरक्षा वाढवण्यासाठी या रडारचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. ए. सूर्यचंद्र राव यांनी नमूद केले की, हे रडार तत्काळ हवामान अंदाज वर्तवण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवेल आणि हवामान तसेच हवामान बदलाच्या प्रतिकृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी योगदान देईल. या सहकार्यामुळे उपग्रह आणि जमिनीवर आधारित तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करून भारताची हवामान निरीक्षण प्रणाली अधिक बळकट होईल, असे यावेळी अंतराळ उपयोजन केंद्राचे संचालक सौम्या एस. सरकार यांनी नमूद केले.
वैज्ञानिकदृष्ट्या, ही प्रणाली प्रजन्य प्रक्रिया, वादळाची उभी रचना आणि अत्यंत खराब हवामान स्थिती यावर सखोल संशोधन करण्यास सक्षम करेल. कार्यात्मकरीत्या, हे रडार पूर आणि भूस्खलनाबाबतची पूर्वसूचना प्रणाली, विमान वाहतूक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, कृषी विषयक सल्ला आणि जलसंपदा नियोजन यांना बळकट करेल, ज्यामुळे या क्षेत्रातील परिणाम-आधारित अंदाज आणि हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता अधिक बळकट होईल. हा उपक्रम हवामान विज्ञानाला प्रगत करण्याच्या, अंदाजाची अचूकता सुधारण्याच्या आणि देशातील हवामानाच्या तीव्र बदलांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule