

गांधीनगर, 29 एप्रिल (हिं.स.)। गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, हिम्मतनगर जवळील जसवंतगढ पाटिया परिसरात शामळाजीहून अहमदाबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी लक्झरी बसने पुढे चाललेल्या इको कारला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शी मूलसिंह मकवाणा यांनी सांगितले की धडक इतकी जबरदस्त होती की कारचा मागील आणि वरचा भाग पूर्णपणे दबला गेला. कारमधील प्रवासी गंभीर जखमी होऊन आतच अडकले होते. अपघातानंतर तात्काळ स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक तपासात समोर आले आहे की खासगी लक्झरी बसच्या चालकाचे स्टीयरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बसने पुढील कारला मागून धडक दिली. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आणि बराच वेळ वाहतूक विस्कळीत राहिली.
हिम्मतनगरचे उपअधीक्षक ए. के. पटेल यांनी सांगितले, “इको कारला लक्झरी बसने मागून धडक दिली, ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटीला जिथे जिथे अनधिकृत कट आहेत ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.” पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मृतांची नावे:
१. शकरीबेन कमलेशकुमार नायक – सरडोई, ता. मोडासा, जिल्हा अरवल्ली
२. कान्ताबेन कानजीभाई निमामा – सरडोई, ता. मोडासा, जिल्हा अरवल्ली
३. हेतलबेन महेशभाई नायक – नवा (रणासणा), ता. तलोद, जिल्हा साबरकांठा
४. मीनाबेन भीखाभाई भोय – सरडोई, ता. मोडासा, जिल्हा अरवल्ली
५. सरलबेन कान्तीलाल भोय – सरडोई, ता. मोडासा, जिल्हा अरवल्ली
६. आशिकबेन कपिललाल नायक – मोयद, ता. प्रांतिज
जखमींची नावे:
१. नायक अंजुबेन (४५ वर्षे)
२. भोय नीताबेन (३६ वर्षे)
३. नायक मीनाक्षीबेन (५० वर्षे)
४. पटेल कामिनीबेन (५६ वर्षे)
५. नायक कंचनबेन (६० वर्षे)
६. प्रजापती नीताबेन (५५ वर्षे)
७. गोस्वामी रेखाबेन (६० वर्षे)
८. रावल अनिलकुमार (चालक, २५ वर्षे)
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule