
चंदीगड, 29 एप्रिल (हिं.स.)। पंजाबच्या राजकारणात राज्यसभा सदस्यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ५ मे रोजी राष्ट्रपतींची भेट घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या प्रकरणाला संवैधानिक पातळीवर नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून जनतेच्या मतांचा सन्मान राखणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, ज्या सदस्यांना पक्ष आणि जनतेच्या विश्वासावर राज्यसभेत पाठवण्यात आले, त्यांचे पक्षांतर करणे हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि सरकार सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियातून हद्दपार केल्या जाणाऱ्या भारतीयांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. आज १५ जणांना हद्दपार केले जात असून, त्यात पंजाबमधील ११ जण आणि एका महिलेचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. इतरांमध्ये तेलंगणातील दोघे, हरियाणातील एक आणि उत्तराखंडमधील दोघांचा समावेश आहे. मान म्हणाले की, ते या लोकांना घेण्यासाठी स्वतः दिल्लीला जातील. ते म्हणाले की, हे लोक पंजाबमध्ये पोहोचताच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.असे त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी पटियालामधील रेल्वे मार्गावरील स्फोटाच्या घटनेबाबतही त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय यंत्रणांसोबत संयुक्तपणे सुरू असून काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत अमृतपाल सिंह यांच्याशी संबंधित काही नावे समोर येत असल्याची माहिती त्यांनी दिली, मात्र अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल असेही त्यांनी नमूद केले.
कायदो-सुव्यवस्थेबाबत बोलताना मुख्यमंत्री मान यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक पाठबळाची पर्वा न करता दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे पंजाबच्या राजकारणात वातावरण तापले असून राज्यसभा वाद, सुरक्षा प्रश्न आणि डिपोर्ट प्रकरण यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule