
नवी दिल्ली, 27 एप्रिल (हिं.स.) : लडाखमधील विविध संघटना आणि केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीमधील चर्चेत निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी गृह मंत्रालयाने आगामी 22 मे रोजी दिल्लीत उपसमितीची बैठक बोलावली आहे. लडाखचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी ट्विटरवर एक्स) संदेश जारी करत याबाबत दिली.
सक्सेना यांनी आपल्या ट्विटर संदेशात सांगितल्यानुसार या बैठकीत लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सचे प्रत्येकी 3 सदस्य तसेच इतर संबंधित घटक सहभागी होणार आहेत. बैठकीत लडाख प्रदेशाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पराज्यपालांनी आशा व्यक्त केली की, या बैठकीतून लडाखमधील प्रमुख घटकांशी रचनात्मक आणि लोकशाही पद्धतीने संवाद साधला जाईल व स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा होईल. गेल्या 4 फेब्रुवारीपासून लडाखमधील संघटनांशी चर्चेची प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र त्यातून ठोस निष्कर्ष निघू शकला नव्हता. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने पुन्हा चर्चेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये लेहमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर चर्चेची प्रक्रिया ठप्प झाली होती. फेब्रुवारीतील बैठकीत लडाखमधील संघटनांनी राज्याचा दर्जा आणि सहावी अनुसूची यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा व्हावी, अशी स्पष्ट मागणी केली होती.दरम्यान, लेह अपेक्स बॉडीचे सह-अध्यक्ष छेरिंग दोरजे यांनी सांगितले की, आगामी बैठकीची माहिती त्यांना सोशल मीडियावरून मिळाली असून, अद्याप गृह मंत्रालयाकडून अधिकृत निमंत्रण प्राप्त झालेले नाही.या बैठकीत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय लवकरच लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स यांच्या संयुक्त बैठकीत घेतला जाणार आहे. लडाखमधील संघटना त्यांच्या मुख्य मागण्यांवर ठाम असून, त्यावरच चर्चा व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी