मुंबईत धक्कादायक घटना: पायधुनीत एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू
मुंबई, 27 एप्रिल (हिं.स.)। येथील पायधुनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या
Mumbai Pydhonie Suspicious Deaths Four Family Members


मुंबई, 27 एप्रिल (हिं.स.)। येथील पायधुनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या दोन मुली आयशा (१६) व झैनब (१३) अशी मृतांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री या कुटुंबाने एकत्र जेवण केले होते आणि त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ले. मात्र, कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने चौघेही घरातच बेशुद्ध पडले.

घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि इमारतीतच राहणाऱ्या डॉ. कुरेशी यांना बोलावण्यात आले. डॉ. कुरेशी घटनास्थळी पोहोचले तेव्हा चौघेही बेशुद्ध अवस्थेत होते. घरात सर्वत्र उलटी झाल्याचे चित्र दिसत होते. त्यांनी तातडीने सर्वांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. लहान मुलीला साबू सिद्दीकी रुग्णालयात, तर आई-वडिलांना जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.

डॉ. कुरेशी यांनी सांगितले की, रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि त्यांच्या शरीरात काहीतरी विषारी घटक गेल्याचा संशय आहे. त्यांच्या रक्तात अॅसिडचे प्रमाण वाढल्याचेही प्राथमिक तपासणीत दिसून आले. त्यांनी सर्वांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नाही. रात्री उशिरा कलिंगड खाल्ल्यानंतरच ही प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्याने विषबाधेचा संशय अधिक गडद झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पायधुनी परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नेमके काय घडले याबाबत सर्वजण हवालदिल झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande