
कोलकाता, २७ एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगालमधील बैरकपूर येथे आयोजित “विजय संकल्प सभेला” संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात मोठे बदल घडवून आणण्याचा दावा केला. त्यांनी १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाला प्रेरणा देणारी बैरकपूरची भूमी आता बंगालच्या बदलाचा मार्ग प्रशस्त करेल, असे मत व्यक्त केले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “बंगालची सेवा करणे, त्याचे संरक्षण करणे आणि त्याला मोठ्या आव्हानांपासून वाचवणे हे माझे कर्तव्य आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, ४ मे नंतर भाजपच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते आत्मविश्वासाने परत येतील.
सभेत उपस्थित प्रचंड गर्दीचा उल्लेख करत त्यांनी सकाळपासून आलेल्या लोकांचे आभार मानले. रोड शोला त्यांनी “तीर्थयात्रेसारखा अनुभव” असे संबोधले.
तृणमूल काँग्रेसवर तीव्र टीका
मोदींनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत राज्यात रोजगार देणाऱ्या गिरण्या बंद होत असल्याचा आणि “बॉम्ब बनवणाऱ्या कारखान्यांचा” विस्तार होत असल्याचा आरोप केला. त्यांनी याला “जंगलराज” असे संबोधले.
तसेच, राज्यातील कायदा-सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि रोजगाराच्या परिस्थितीवरही त्यांनी टीका केली.
महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी मतदारांना कमळ चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले. “मुली निर्भयपणे बाहेर पडतील अशी व्यवस्था निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले.
रोजगार आणि विकासाचे आश्वासन
पंतप्रधानांनी सांगितले की, भाजप सरकार आल्यास पारदर्शक भरती प्रक्रिया, रिक्त पदांची पूर्तता आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाईल. ग्रामीण भागात रोजगार हमी वाढवण्याचीही त्यांनी घोषणा केली.
कोलकाताला “लंडनसारखे शहर” बनवण्याच्या आश्वासनांवर टीका करत त्यांनी शहराच्या बदलत्या ओळखीबाबत चिंता व्यक्त केली आणि नागरिकांना विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
सभेच्या शेवटी मोदींनी बंगालच्या विकासासाठी “वंदे मातरम” हा मंत्र असल्याचे सांगत राज्याच्या पुनर्बांधणीचा विश्वास व्यक्त केला.
-----------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे