
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाला सत्कार
नागपूर, 27 एप्रिल (हिं.स.) : नागपुरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात सोमवारी आयोजित समारंभात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी श्रीराम मंदिराच्या बांधकामाशी संबंधित 30 मान्यवरांचा सन्मान केला.
डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेल्या विभुतींमध्ये रमजानभाई, नृपेन्द्र मिश्र, जगदीश आफळे, गिरीश सहस्त्रभोजनी, जगन्नाथ गुळवे, आशिष सोमपुरा, निखिल सोमपुरा, अरुण योगिराज, जय काकतीकर, मनोज त्रिपाठी, सत्यनारायण पांडे, अनिल सुतार, केशव शर्मा, विनोद शुक्ला, राजीव दुबे, मनीष दाधीच, विनोद मेहता, अंकुर जैन, राजूकुमार सिंह, ए. व्ही. एस. सूर्या श्रीनिवास, नरेश मालवीय, परेश सोमपुरा, नाथ अय्यर, संजय तिवारी, शरद बाबू, अनिल मिश्र, गोपाल, चंपत राय, गोविंददेवगिरी महाराज आणि वासुदेव कामत यांचा समावेश होता.कार्यक्रमात राम मंदिराचे बांधकाम हे 500 वर्षांच्या ऐतिहासिक संघर्षाचे फलित असल्याचे सांगण्यात आले. वक्त्यांनी 22 जानेवारी 2024 रोजी झालेल्या श्रीराम लला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भारतीय संस्कृतीसाठी ऐतिहासिक आणि भावनिक क्षण असल्याचे नमूद केले, ज्यामुळे “सर्वांमध्ये राम, सर्वांचे राम” ही भावना अधिक दृढ झाली आहे.
याप्रसंगी आपल्या भाषणात डॉ. भागवत यांनी सांगितले की, मंदिराचे बांधकाम ही केवळ भौतिक योजना नसून समाजाच्या सामूहिक श्रद्धा आणि संकल्पाचे प्रतीक आहे. त्यांनी उदाहरण देत म्हटले की, जसे गोवर्धन पर्वत उचलताना सर्वांचे योगदान असते, तसेच या भव्य मंदिराच्या उभारणीतही समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग राहिला आहे. भारताच्या प्रगतीला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासाशी जोडत त्यांनी समाजाच्या सक्रिय भूमिकेवर भर दिला.
डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे अध्यक्ष भैय्याजी जोशी यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांपासून आधुनिक भारतापर्यंतच्या संघर्षांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, हे मंदिर केवळ धार्मिक वास्तू नसून भारतीय समाजाच्या पुनर्जागरणाचे प्रतीक आहे, जे 500 वर्षांच्या संघर्ष, जनआंदोलन आणि न्यायप्रक्रियेनंतर साकार झाले आहे.
तसेच श्रीराम मंदिराच्या बांधकामाशी संबंधित चंपत राय यांनी मंदिराच्या तांत्रिक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत सांगितले की, दीर्घकालीन टिकाऊपणा लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, लोखंडाचा वापर न करता हे मंदिर उभारण्यात आले आहे. देशभरातील कारागीर आणि संस्थांच्या सहकार्याने हा भव्य प्रकल्प पूर्ण झाला. कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रसंगी गोविंद देवगिरी महाराज यांनी या कार्याला शतकभराच्या तपस्येचे फलित म्हटले आणि समाजाने “रामराज्य” स्थापनेच्या दिशेने सतत कार्यरत राहावे, असे आवाहन केले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी