
नवी दिल्ली, 27 एप्रिल (हिं.स.)। किर्गिस्तानमधील बिश्केक इथे मंगळवार, 28 एप्रिल रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भारताचे उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या बैठकीत सहभागी होणारे सर्व सदस्य देशांचे संरक्षण मंत्री, या क्षेत्रातील संरक्षण आणि सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील. यासोबतच आंतरराष्ट्रीय शांतता, दहशतवादाचा सामना आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांमधील संरक्षण सहकार्य यांसारख्या विषयांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.
सध्या पश्चिम आशियात तणावपूर्ण संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याने, अनेक भूराजकीय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर या वर्षीची शांघाय सहकार्य संघटनेची बैठक होत आहे. शांघाय सहकार्य संघटना ही या प्रदेशातील सर्वात मोठ्या राजकीय आणि आर्थिक संघटनांपैकी एक आहे. त्या अनुषंगाने या बैठकीत सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा होण्याचीही शक्यता आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्याच्या जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने आव्हानात्मक असलेल्या काळात, जागतिक शांतता राखण्याबद्दलची भारताची वचनबद्धता अधोरेखित करतील. यासोबतच ते दहशतवाद आणि कट्टरतावादाविरोधात शून्य सहिष्णुतेची भारताची सातत्यपूर्ण भूमिकाही ठळकपणे मांडतील. या बैठकीच्या निमित्ताने राजनाथ सिंह, या बैठकीत सहभागी होणाऱ्या काही देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करण्याचीही शक्यता आहे.
शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना दि 15 जून 2001 रोजी चीनमधील शांघाय इथे झाली होती. ही एक आंतर सरकारी संस्था आहे. भारत, रशिया, चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि बेलारूस हे या संघटनेचे सदस्य देश आहेत. भारत 2017 मध्ये या संघटनेचा पूर्णकालीन सदस्य बनला आणि 2023 मध्ये भारताकडे या संघटनेचे फिरते अध्यक्षपद आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule