
तपासात सर्व धमक्या खोट्या असल्याचे स्पष्ट
नवी दिल्ली, 27 एप्रिल (हिं.स.) : दिल्लीतील 4 शाळांना आज, सोमवारी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली. या धमक्यांमुळे शाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नंतर दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी या सर्व धमक्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा अलर्ट मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. स्थानिक पोलिस आणि शाळा प्रशासनाच्या मदतीने संपूर्ण परिसराची तपासणी तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षित बाहेर काढण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. सर्व ठिकाणी सखोल शोधमोहीम घेण्यात आली, मात्र कुठेही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
ज्या शाळांना धमकीचे ईमेल आले त्यामध्ये धौला कुआं, दिल्ली कॅन्ट आणि शंकर विहार येथील आर्मी पब्लिक स्कूल तसेच द्वारका सेक्टर 14 मधील सीआरपीएफ स्कूलचा समावेश होता.सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, या ईमेलचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. सायबर सेलच्या पथकांकडून या धमकीमागील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा लवकरच उलगडा करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. -----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी