
भोपाळ , 27 एप्रिल (हिं.स.)।मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथे रविवारी उशिरा रात्री एका टवेरा आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीची समोरासमोर धडक होऊन भीषण रस्ते अपघाताची घटना घडली.या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, महेंद्रवाडी आणि माखननगर येथील काही नागरिक बुधनी येथे लग्नसमारंभ आटोपून टवेरा वाहनाने परतत होते. याचदरम्यान त्यांच्या वाहनाची धान्याने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक बसली. क्रॉसिंगदरम्यान टवेरा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते ट्रॉलीच्या बाजूला जाऊन आदळल्याचे सांगितले जात आहे. माखननगर पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी मध्यरात्री सुमारे १ ते २ वाजण्याच्या दरम्यान नर्मदापूरम-पिपरिया राज्य महामार्गावरील आंचलखेडा गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
धडक इतकी भीषण होती की टवेरा वाहन पूर्णपणे चुराडा झाले आणि घटनास्थळी आरडाओरड सुरू झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी आणि मृतांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले, तर सहा ते सात जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघाताचा तपास सुरू केला आहे.
प्राथमिक तपासात कमी दृश्यमानता, रात्रीची वेळ किंवा चालकाची निष्काळजीपणा ही अपघाताची संभाव्य कारणे मानली जात आहेत. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या भीषण अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. जिल्हा रुग्णालयात रात्रभर मृतांच्या नातेवाईकांची आणि ग्रामस्थांची गर्दी होती. लग्नाचा आनंद काही क्षणांतच दुःखात बदलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode