अब्बास अराघचींचा ४८ तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; शांतता प्रयत्नांना वेग
इस्लामाबाद, 28 एप्रिल (हिं.स.)।इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची मंगळवारी पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. गेल्या ४८ तासांतील इस्लामाबादचा हा त्यांचा तिसरा दौरा आहे. रशियाचा दौरा पूर्ण केल्यानंतर त्यांनी ही भेट दिली आहे. अमेरिकेसोबत सुरू
अब्बास अराघचींचा ४८ तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; शांतता प्रयत्नांना वेग


इस्लामाबाद, 28 एप्रिल (हिं.स.)।इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची मंगळवारी पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. गेल्या ४८ तासांतील इस्लामाबादचा हा त्यांचा तिसरा दौरा आहे. रशियाचा दौरा पूर्ण केल्यानंतर त्यांनी ही भेट दिली आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक राजनैतिक प्रयत्नांचा हा भाग असल्याचे मानले जात आहे.

अराघची यांच्या वारंवार पाकिस्तान दौऱ्यांमुळे सध्याच्या परिस्थितीत इस्लामाबाद शांतिदूताची भूमिका बजावत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः, इराण आणि अमेरिका यांच्यातील अप्रत्यक्ष संवाद सुलभ करण्यामध्ये पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे या भेटीतून स्पष्ट होते.

यापूर्वी अराघची यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत चर्चा केली होती. या बैठकीत द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक घडामोडींवर भर देण्यात आला. निवेदनात अराघची यांनी सांगितले की, ही बैठक दीड तासांहून अधिक काळ चालली आणि त्यामध्ये अमेरिका व इस्रायलने लादलेल्या युद्ध आणि आक्रमकतेच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली.इराणी परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले, “राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबतची आमची बैठक अत्यंत सकारात्मक झाली. यात द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक प्रश्न तसेच अमेरिका आणि झायोनी शासनाने लादलेल्या युद्ध व आक्रमकतेच्या मुद्द्यावर विस्तृत चर्चा झाली.”

अराघची यांनी तेहरान आणि मॉस्को यांच्यातील सहकार्यावरही चर्चा केली. संबंध अधिक बळकट करण्याच्या प्रस्तावांचाही यात समावेश होता. त्यांनी इराण-रशिया संबंधांना रणनीतिक भागीदारी असे संबोधले आणि संघर्षकाळात मॉस्कोकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, “अलीकडील युद्धात हे स्पष्ट झाले की, इराणकडे रशियासारखा महान मित्र आणि सहकारी आहे. तुमच्या भूमिकेसाठी आणि पाठिंब्यासाठी आम्ही आभारी आहोत.”

इराणी सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सांगितले की, रशिया पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल आणि इराणच्या हितसंबंधांना पुढे नेईल. त्यांनी लवकरच या प्रदेशात स्थैर्य परत येईल, अशी आशा व्यक्त केली.दरम्यान, वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसने पुष्टी केली आहे की, इराणने संघर्ष समाप्त करून होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा पथकासोबत या प्रस्तावावर चर्चा केली आहे. लेविट म्हणाल्या, “या प्रस्तावावर चर्चा सुरू होती आणि पुढील तपशील राष्ट्राध्यक्ष स्वतः जाहीर करतील.”

या प्रस्तावात अणुचर्चा पुढील टप्प्यात घेण्यासह, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे आणि युद्ध समाप्त करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रदेशात तणावपूर्ण वातावरण असताना ही राजनैतिक हालचाल सुरू आहे. त्यामुळे हे प्रयत्न शांतता प्रस्थापित करण्यात कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande