पेंटागॉन ट्रम्प यांना इराण युद्धाबद्दल चुकीची माहिती देत आहे, जेडी व्हान्स यांचा संशय
वॉशिंग्टन , 29 एप्रिल (हिं.स.)। अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत मतभेदांच्या बातम्या समोर येत आहेत. एका अहवालानुसार, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांना असा संशय आहे की पेंटागॉन राष्ट्राध्य
पेंटागॉन ट्रम्प यांना इराण युद्धाबद्दल चुकीची माहिती देत आहे, जेडी व्हान्स यांचा संशय


वॉशिंग्टन , 29 एप्रिल (हिं.स.)। अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत मतभेदांच्या बातम्या समोर येत आहेत. एका अहवालानुसार, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांना असा संशय आहे की पेंटागॉन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धाच्या प्रत्यक्ष परिस्थितीबाबत अचूक माहिती देत नाही.

संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन हे गेल्या आठ आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकन सैन्याच्या कामगिरीचे जोरदार कौतुक करत आहेत. त्यांनी इराणच्या हवाई दल, नौदल आणि संरक्षण पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर नाश केल्याचा दावा केला आहे. तसेच अमेरिकेकडे अजूनही मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा उपलब्ध असल्याचेही ते सांगत आहेत. मात्र अहवालानुसार, जेडी व्हान्स यांनी बंद दाराआड झालेल्या बैठकीत या दाव्यांवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्हान्स यांचे मत आहे की ट्रम्प यांच्यासमोर युद्धाचे जे चित्र सादर केले जात आहे, ते वास्तवापासून दूर असू शकते.

विशेषतः अमेरिकेच्या क्षेपणास्त्र साठ्यात झालेल्या मोठ्या घटेबाबत ते चिंतित असल्याचे सांगितले जाते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, व्हान्स यांनी मिसाइल प्रणालीच्या उपलब्धतेवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. इराणविरुद्धच्या युद्धात याच प्रकारे शस्त्रास्त्रांचा वापर सुरू राहिला, तर भविष्यात चीन, उत्तर कोरिया किंवा रशियासोबत संभाव्य संघर्ष झाल्यास अमेरिकेकडे पुरेसे संसाधन उरणार नाहीत, अशी त्यांची भीती आहे.

असेही म्हटले जाते की, जेडी व्हान्स सुरुवातीपासूनच ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’च्या विरोधात होते. या मोहिमेमुळे नुकसान होईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे झालेल्या शांतता चर्चेच्या पहिल्या फेरीचे नेतृत्वही व्हान्स यांनी केले होते, मात्र ती चर्चा निष्फळ ठरली. या आठवड्यात होणारी दुसरी फेरीही रद्द करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, जेडी व्हान्स सार्वजनिकरित्या पीट हेगसेथ यांचे कौतुक करत असले, तरी खासगी बैठकीत ते रणनीतीतील त्रुटींवर बोट ठेवत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हेगसेथ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना जे ऐकायचे आहे, तेच सांगत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande