
इस्लामाबाद, 29 एप्रिल (हिं.स.)। पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे पाकिस्तानमध्ये इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी सांगितले की, देशाकडे एक दिवसापुरताही धोरणात्मक पेट्रोलियम साठा उपलब्ध नाही.
पाकिस्तानच्या टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मलिक यांनी या संकटाची गंभीरता स्पष्ट केली. त्यांनी खेद व्यक्त करत सांगितले की, पाकिस्तानकडे केवळ ५ ते ७ दिवस पुरेल इतकाच व्यावसायिक कच्च्या तेलाचा साठा आहे. भारताशी तुलना करता भारताकडे यापेक्षा खूप मोठा साठा उपलब्ध आहे. मलिक म्हणाले, “आमच्याकडे कोणताही धोरणात्मक तेलसाठा नाही. आमच्याकडे फक्त व्यावसायिक साठे आहेत. त्यामध्येही केवळ पाच ते सात दिवस पुरेल इतके कच्चे तेल आहे. तसेच तेल विपणन कंपन्यांकडे (ओएमसी) असलेली शुद्धीकरण केलेली उत्पादने फक्त २० ते २१ दिवस चालू शकतात. आम्ही भारतासारखे नाही, ज्याच्याकडे ६० ते ७० दिवसांचा साठा आहे आणि जो केवळ एका स्वाक्षरीने तो उपलब्ध करू शकतो.”
त्यांनी पुढे सांगितले की, या युद्धामुळे पाकिस्तानमध्ये तेल साठवण क्षमता वाढवण्याची आणि दीर्घकालीन ऊर्जा तयारी मजबूत करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. यासंदर्भात सविस्तर अहवालही तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे धोरणात्मक साठे कसे सुरू करता येतील, याबाबत तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
मंत्री म्हणाले की, या अहवालावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, कारण हे साठे उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार असून तो कोट्यवधी डॉलरपर्यंत जाऊ शकतो. मलिक यांनी हेही नमूद केले की, ऐतिहासिकदृष्ट्या दुबई कच्च्या तेलाच्या किमती कधीही १७० डॉलर इतक्या उच्च पातळीवर पोहोचल्या नव्हत्या. हे जागतिक बाजारपेठेतील तीव्र अस्थिरतेचे संकेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, शहबाज शरीफ यांचे सरकार जनतेच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करत असून शक्य तिथे अनुदान देण्याचाही प्रयत्न करत आहे.
भारताच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यांची (एसपीआर) एकूण क्षमता ५.३३ दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) इतकी आहे, जी सुमारे ३६.९२ दशलक्ष बॅरल इतकी आहे. याउलट, पाकिस्तानकडे स्वतंत्र धोरणात्मक पेट्रोलियम साठे नाहीत आणि त्याच्याकडे मर्यादित व्यावसायिक साठेच उपलब्ध आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीशी संबंधित वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादने ९० दिवसांचा साठा निर्माण करण्याची योजना जाहीर केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode