
वॉशिंग्टन, 28 एप्रिल (हिं.स.)।वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स असोसिएशन डिनरदरम्यान झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा खटला चालवला जाणार आहे. हत्येचा प्रयत्न करण्याबरोबरच आरोपीवर शस्त्रांच्या बेकायदेशीर वापराचेही गुन्हे दाखल करण्यात आले असून तो दोषी ठरल्यास त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
माहितीनुसार, आरोपी 31 वर्षीय कोल टोमास ऍलन हा हा हल्ला अनेक आठवड्यांपासून आखत होता. हल्ल्यानंतर पकडल्यापासून अॅलनने मौन बाळगले आहे. मात्र, हल्ल्याच्या अगोदर त्याने आपल्या कुटुंबीयांना आणि माजी नियोक्त्याला पाठवलेल्या ई-मेलमधून त्याच्या हेतूंचा खुलासा झाला आहे. त्या मेलमध्ये त्याने स्वतःला “फ्रेंडली फेडरल असॅसिन” असे संबोधले होते आणि ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याने आपल्या कुटुंबीयांची माफीही मागितली होती आणि या हल्ल्याला निरोप संदेशाचे स्वरूप दिले होते.
कार्यवाहक अटर्नी जनरल टॉड ब्लँच यांनी स्पष्ट केले की, लोकशाही संस्थांना घाबरवण्यासाठी हिंसेचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. अॅलनवर हत्येचा प्रयत्न करण्याबरोबरच शस्त्रांच्या बेकायदेशीर वापराचेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तो दोषी ठरल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. सध्या न्यायालयाने त्याला जामीन नाकारत तुरुंगात पाठवले असून पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.
शनिवारी संध्याकाळी डिनर कार्यक्रम सुरू होताच कॅलिफोर्नियातील टॉरन्स येथील रहिवासी अॅलनने सुरक्षा घेरा तोडून बॉलरूमकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीक्रेट सर्व्हिस एजंट्स आणि अॅलन यांच्यात गोळीबार झाला. या हल्ल्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंचावर उपस्थित होते. गोंधळाच्या परिस्थितीत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवले. गोळीबार सुरू असताना अनेक पाहुण्यांना टेबलाखाली लपावे लागले. अॅलनकडून 12-बोर पंप-अॅक्शन शॉटगन आणि 38 कॅलिबर पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
एफबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार हा हल्ला अचानक करण्यात आलेला नव्हता. अॅलनने 6 एप्रिललाच त्या हॉटेलमध्ये खोली आरक्षित केली होती, जिथे हा कार्यक्रम होणार होता. तो गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियाहून ट्रेनने वॉशिंग्टन येथे पोहोचला आणि कार्यक्रमाच्या एक दिवस आधी हॉटेलमध्ये चेक-इन केले. तपासात समोर आले आहे की आरोपी उच्चशिक्षित व्यावसायिक आहे. त्याने कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून 2025 मध्ये कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode