
कोलकाता, 28 एप्रिल (हिं.स.) : रोज व्हॅली ग्रुप पोंजी घोटाळ्यातील पीडित गुंतवणूकदारांना अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) दिलासा देत तब्बल 127.69 कोटी रुपयांची परतफेड केली आहे. एसेट डिस्पोजल कमिटीच्या (एडीसी) सहकार्याने जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ईडीने 1.7 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना एकूण 127.69 कोटी रुपये परत मिळवून दिले आहेत.
एप्रिल 2026 पर्यंत या संयुक्त प्रयत्नांतर्गत निधी पुनर्प्राप्तीचे अनेक टप्पे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया पारदर्शकता आणि पीडित-केंद्रित कायदेशीर कारवाईचे उत्तम उदाहरण मानली जात आहे. या कारवाईमुळे ईडी ची भूमिका केवळ चौकशीपुरती मर्यादित नसून, जप्त मालमत्तेची विक्री करून ती मूळ हक्कदारांपर्यंत पोहोचवण्यातही ती सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोज व्हॅली ग्रुपने पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा आणि इतर राज्यांतील गुंतवणूकदारांना उच्च परताव्याचे आश्वासन देत सुमारे 17,520 कोटी रुपये फसवणुकीने गोळा केले होते. त्यापैकी सुमारे 6,666 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत देण्यात आले नव्हते.
चौकशी सुरू झाल्यापासून ईडीने कंपनीच्या मालमत्तांचा शोध, जप्ती आणि संरक्षण यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत. आतापर्यंत पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि त्रिपुरा राज्यांमध्ये सुमारे 1,568 कोटी रुपये किंमतीच्या चल व अचल मालमत्तांची जप्ती किंवा अटॅचमेंट करण्यात आली आहे. मोबदला प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा 22 एप्रिल 2025 रोजी गाठण्यात आला, जेव्हा भुवनेश्वर येथील विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीने एडीसीला 517.54 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सोपवला होता.
तसेच, दाव्यांची पडताळणी आणि देयक प्रक्रिया अधिक वेगवान व अचूक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. यासाठी 31 मार्च रोजी उच्च न्यायालयाची मंजुरी मिळाली असून एडीसीने ‘स्टॉक होल्डिंग डॉक्युमेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड’ या सरकारी कंपनीसोबत करार केला आहे. याशिवाय, ईडी पश्चिम बंगालमधील इतर चिट फंड घोटाळ्यांचीही चौकशी करत असून, पीडित गुंतवणूकदारांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती कायदेशीर पावले उचलत आहे. ईडीने स्पष्ट केले आहे की, गुन्ह्यातून मिळालेल्या मालमत्तेचे संरक्षण, त्याचे रोखीकरण आणि ती रक्कम कायदेशीर गुंतवणूकदारांना पारदर्शक आणि जलद पद्धतीने परत देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी