इराण युद्धानंतर पहिल्यांदाच एलएनजी टँकरने होर्मुझ मार्ग ओलांडला, टँकर भारताजवळ दिसला
नवी दिल्ली , 28 एप्रिल (हिं.स.)।यूएईची एडीएनओसी कंपनीद्वारे व्यवस्थापित एका निर्बंधित एलएनजी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनी पार केली असून तो आता भारताजवळ दिसत आहे. सोमवारी जहाज-ट्रॅकिंग डेटामधून ही माहिती समोर आली. याची पुष्टी झाल्यास, २८ फेब्रुवारीला
इराण युद्धानंतर पहिल्यांदाच एलएनजी टँकरने होर्मुझ मार्ग ओलांडला, टँकर भारताजवळ दिसला


नवी दिल्ली , 28 एप्रिल (हिं.स.)।यूएईची एडीएनओसी कंपनीद्वारे व्यवस्थापित एका निर्बंधित एलएनजी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनी पार केली असून तो आता भारताजवळ दिसत आहे. सोमवारी जहाज-ट्रॅकिंग डेटामधून ही माहिती समोर आली. याची पुष्टी झाल्यास, २८ फेब्रुवारीला इराण युद्ध सुरू झाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारा हा पहिला एलएनजी टँकर ठरेल. १,३६,३५७ घनमीटर क्षमतेचा हा टँकर एडीएनओसी लॉजिस्टिक आणि सर्व्हिसेस या कंपनीकडून व्यवस्थापित केला जातो. तो शेवटचा ३० मार्च रोजी आखात परिसरात दिसला होता. आता तो भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आढळून आला आहे.

मरीन ट्रॅफिक , आयसीआयएस एलएनजी एज आणि एलएसइजी यांच्या डेटानुसार, अनेक आठवडे कोणताही सिग्नल न देता राहिल्यानंतर या जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनी पार केल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, एडीएनओसीने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. जहाज-ट्रॅकिंग डेटानुसार, आखात परिसरातील अनेक जहाजे लक्ष्य बनणे किंवा ताब्यात घेतले जाणे टाळण्यासाठी विविध युक्त्या वापरत आहेत. यात स्वतःचे लोकेशन प्रसारण बंद करणे किंवा चुकीचे ओळख क्रमांक पाठवणे यांचा समावेश आहे.

आयसीआयएसचे वरिष्ठ एलएनजी विश्लेषक ॲलेक्स फ्रॉली म्हणाले, “कधी कधी सिग्नल डेटामध्ये त्रुटी दिसतात, काही जहाजे चुकीची लोकेशन माहिती देतात किंवा दुसऱ्या जहाजाचा एमएमएसआय क्रमांक वापरतात. मात्र सध्या दिसत असलेल्या लोकेशनमध्ये असे काही स्पष्टपणे दिसत नाही.”ते पुढे म्हणाले, “जर या टँकरने प्रत्यक्षात मार्ग पार केला असेल, तर जागतिक गॅस बाजारासाठी हा आशेचा किरण ठरू शकतो. मात्र हे अजून सुरुवातीचे संकेत आहेत. केवळ एका टँकरने मार्ग पार केला म्हणून लगेच इतर टँकरही त्याच मार्गाने जातील, असे नाही. कारण परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.”

एप्रिल महिन्यात कतारच्या काही टँकरांनी दोनदा ही सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आले नव्हते. या महिन्याच्या सुरुवातीला ओमानच्या एक रिकामा एलएनजी टँकर मात्र ही सामुद्रधुनी पार करण्यात यशस्वी झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande