होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, जहाजांना जाऊ द्या-अँटोनियो गुटेरेस यांचे आवाहन
अल्बानी, 28 एप्रिल (हिं.स.)।संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा परिषदेतील समुद्री मार्गांच्या सुरक्षेवरील चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, या मार्गावरून जहाजांच्या मुक
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, जहाजांना जाऊ द्या-अँटोनियो गुटेरेस यांचे अमेरिक-इराणला आवाहन


अल्बानी, 28 एप्रिल (हिं.स.)।संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा परिषदेतील समुद्री मार्गांच्या सुरक्षेवरील चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, या मार्गावरून जहाजांच्या मुक्त आणि निर्बंधरहित वाहतुकीच्या अधिकाराचा पूर्ण सन्मान झाला पाहिजे. त्यांनी यावर भर दिला की, हे नियम कोणताही विलंब न करता तातडीने लागू करणे आवश्यक आहे.

यासंदर्भात गुटेरेस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, “होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या नौवहनाच्या अधिकारांचा आणि स्वातंत्र्याचा सन्मान झाला पाहिजे. मी सर्व पक्षांना आवाहन करतो की, सामुद्रधुनी खुली करा. जहाजांना जाऊ द्या. कोणताही टोल लावू नका. कोणताही भेदभाव करू नका. व्यापार पुन्हा सुरू होऊ द्या. जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा भरभराट होऊ द्या. सुरक्षित आणि अखंडित वाहतूक आर्थिक तसेच मानवी दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे.”

गुटेरेस यांनी इशारा दिला की, या दबावामुळे इंधनाच्या टाक्या आणि दुकानांतील शेल्फ रिकामे होत आहेत. अनेक ठिकाणी लोकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. जर ही अडचण कायम राहिली, तर जगासमोर मोठे अन्नसंकट उभे राहू शकते. त्यामुळे आफ्रिका आणि दक्षिण आशियातील कोट्यवधी लोक भूक आणि गरिबीच्या विळख्यात सापडू शकतात. संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी सांगितले की, हा मार्ग सुरक्षित आणि खुला ठेवणे आर्थिक तसेच मानवी दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे.

या संकटाचा सर्वाधिक फटका त्या गरीब आणि लहान द्वीपीय देशांना बसत आहे, जे समुद्री आयातीवर अवलंबून आहेत. या संकटात त्यांची कोणतीही चूक नसतानाही ते सर्वाधिक नुकसान सहन करत आहेत. गुटेरेस यांनी सर्व देशांना संयम बाळगण्याचे आणि परस्पर संवाद वाढवण्याचे आवाहन केले. तसेच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मदत करण्याची तयारीही दर्शवली. ते म्हणाले, “समुद्र हा शांतता आणि सहकार्याचा प्रदेश असला पाहिजे, संघर्षाचा नव्हे. योग्य निर्णय घेण्याची आणि ठोस पावले उचलण्याची हीच योग्य वेळ आहे.”

होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानला जातो. जगातील एकूण तेल व्यापारापैकी सुमारे पाचवा हिस्सा याच मार्गाने होतो. याशिवाय, जगातील पाचवा हिस्सा द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) आणि जवळपास एकतृतीयांश खतांचा व्यापारही याच मार्गावर अवलंबून आहे. या समुद्री मार्गातील अडथळ्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. ऊर्जा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहेत. मालवाहतुकीचा खर्च आणि विमा प्रीमियम मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोरोना साथरोग आणि युक्रेन संकटानंतर आता ही पुरवठा साखळीसमोरील सर्वात मोठी समस्या ठरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande