
गंगटोक, 28 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर असून, या भेटीदरम्यान ते 4 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी गंगटोकमध्ये युवकांसोबत फुटबॉल खेळत अनौपचारिक संवाद साधला. या क्षणांचे फोटो त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केले.
छायाचित्रांमध्ये ते तिरंग्याचे चिन्ह असलेले निळे स्पोर्ट्स जॅकेट परिधान केलेले दिसतात. सर्व सहभागी युवक एकसारख्या किटमध्ये असून, त्यांच्या हातात फुटबॉल होता.
पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये लिहिले, “गंगटोकमधील सुंदर सकाळ… सिक्कीममध्ये माझ्या छोट्या मित्रांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद काही वेगळाच आहे!” तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “या युवकांसोबत फुटबॉलचे एक शानदार सत्र झाले!”
या दौऱ्यात पंतप्रधान सिक्कीम राज्य स्थापनेच्या 50 वर्षपूर्ती निमित्त आयोजित समारोप सोहळ्यातही सहभागी होणार आहेत. ते गंगटोक येथील सुवर्णजयंती मैत्री मंजरि पार्कमधील ऑर्किडेरियमला भेट देतील, जे जागतिक दर्जाच्या ऑर्किड अनुभव केंद्राच्या रूपात विकसित करण्यात आले आहे.
कार्यक्रमानंतर पंतप्रधान पालजोर स्टेडियममध्ये जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. याआधी सोमवारी त्यांनी गंगटोकमध्ये रोड शोचे नेतृत्व केले होते. खराब हवामानामुळे त्यांचा पूर्वनियोजित दौरा पुढे ढकलला गेला होता.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode