पश्चिम बंगाल : दुसऱ्या टप्प्यातील 142 जागांवर बुधवारी मतदान
कोलकाता, 28 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या, बुधवार (29 एप्रिल) रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातील एकूण 142 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 152 जागांवर तब्बल 92
ममता बॅनर्जींचा प्रचाराचा संग्रहित फोटो


कोलकाता, 28 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या, बुधवार (29 एप्रिल) रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातील एकूण 142 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 152 जागांवर तब्बल 92.88 टक्के मतदान झाले होते. या टप्प्याचा प्रचार सोमवारी थांबला असून, प्रचार थांबला असला तरी राज्यातील राजकीय वातावरण मात्र अजूनही तापलेले आहे.

या टप्प्यात 7 जिल्ह्यांतील 142 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. एकूण 3 कोटी 21 लाख 73 हजार 837 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 57 लाख 37 हजार 418 महिला मतदार, 1 कोटी 64 लाख 35 हजार 627 पुरुष मतदार आणि 792 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या टप्प्यात 1,448 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, त्यापैकी 220 महिला उमेदवार आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कल्याणी हा सर्वात मोठा मतदारसंघ असून जोरासांको सर्वात लहान मतदारसंघ आहे. मतदारसंख्येनुसार हुगळी जिल्ह्यातील चिनसुराहमध्ये सर्वाधिक 2,75,715 मतदार आहेत, तर उत्तर 24 परगना जिल्ह्यातील भाटपारामध्ये सर्वात कमी 1,17,195 मतदार आहेत.

या मतदानासाठी सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे. केंद्रीय दलांच्या 2,321 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच 142 सामान्य पर्यवेक्षक, 95 पोलीस पर्यवेक्षक आणि 100 खर्च पर्यवेक्षक देखील कार्यरत राहणार आहेत.राज्यात एकूण 41,001 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत, ज्यामध्ये 39,301 मुख्य आणि 1,700 सहाय्यक केंद्रांचा समावेश आहे. यापैकी 14,218 केंद्रे शहरी भागात आणि 25,083 ग्रामीण भागात आहेत. 8,845 मतदान केंद्रांचे संचालन महिला कर्मचारी करतील, तर 298 मॉडेल मतदान केंद्रे असतील. तसेच 13 मतदान केंद्रे दिव्यांग व्यक्ती चालवणार आहेत.

दरम्यान, मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, मतदानादरम्यान कोणतीही बोगस मतदान किंवा गडबड होणार नाही यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सर्व संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून वेळेत अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande