
इस्लामाबाद , 28 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा अतिशय जवळचा सहकारी आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सदस्य शेख युसुफ आफ्रिदी याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिदीला पाकिस्तानातील खैबर जिल्ह्यातील लांडी कोटल भागात लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी युसुफ आफ्रिदीवर घात लावून हल्ला केला आणि त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आफ्रिदीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने किंवा गटाने या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही. युसुफ आफ्रिदीला लष्करच्या प्रादेशिक रचनेचा कणा मानले जात होते.
माहितीनुसार, त्याच्याकडे संघटनेतील दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. तो खैबर पख्तूनख्वा आणि आदिवासी भागातील युवकांचे ब्रेनवॉश करून त्यांना लष्करमध्ये भरती करत असे. तसेच सीमावर्ती भागात शस्त्रांची वाहतूक आणि दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित ठिकाणे उपलब्ध करून देण्यात तो पारंगत होता.तसेच, तो अहल-ए-हदीस म्हणजेच सलाफी विचारसरणीतील मोठे नाव मानला जात होता. आपल्या भाषणांतून तो दहशतवादाला धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असे, ज्यामुळे लष्करला वैचारिक बळ मिळत होते.
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदसाठी ही बातमी मोठा धक्का मानली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून लष्करच्या वरिष्ठ नेतृत्वाला नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य केले जात आहे. अवघ्या आठवडाभरापूर्वी लष्करचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता आणि संस्थापक सदस्य आमिर हमजा याच्यावर लाहोरमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता.युसुफ आफ्रिदीच्या मृत्यूमुळे लष्करचे ते जाळे उद्ध्वस्त झाले आहे, जे आदिवासी भागातून नव्या दहशतवाद्यांची फौज तयार करत होते.
२०१९ पासून कोट लखपत तुरुंगात बंद असलेला हाफिज सईद आता बाहेर आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना एकामागोमाग पडताना पाहत आहे. त्याच्या संघटनेचे कमांड अँड कंट्रोल पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वृत्तानुसार, जमात-उद-दावा या संघटनेने दावा केला आहे की, या हत्येमागे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) सारख्या गटांचा हात असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानात आता दहशतवादी गटांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष सुरू झाला आहे. सलाफी धर्मगुरू आणि कट्टरपंथी गटांतील वाढते वैचारिक मतभेद आता रस्त्यावर रक्तपाताच्या स्वरूपात दिसू लागले आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानातील सुरक्षित आश्रयस्थानांमध्येही लष्करचे कमांडर आता सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode