ओडिशात मृत बहिणीचा सांगाडा बँकेत आणण्याची वेळ
भुवनेश्वर, 28 एप्रिल : ओडिशातील केओन्झर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बँकिंग व्यवस्थेतील असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघडकीस आली असून, एका व्यक्तीला आपल्या मृत बहिणीच्या खात्यातील पैसे मिळवण्यासाठी तिचा सांगा
odisha man carries sisters skeleton bank withdraw money


भुवनेश्वर, 28 एप्रिल : ओडिशातील केओन्झर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बँकिंग व्यवस्थेतील असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघडकीस आली असून, एका व्यक्तीला आपल्या मृत बहिणीच्या खात्यातील पैसे मिळवण्यासाठी तिचा सांगाडा थेट बँकेत आणावा लागल्याची संतापजनक बाब समोर आली आहे.

पाटना ब्लॉकमधील दियानाली गावातील जितू मुंडा (वय ५०) यांच्या मोठ्या बहिणी कालरा मुंडा (वय ५६) यांचे दोन महिन्यांपूर्वी आजाराने निधन झाले होते. त्यांनी जनावरे विकून कष्टाने साठवलेले सुमारे २० हजार रुपये ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालीपोसी शाखेत जमा होते. वारस नसल्यामुळे हे पैसे मिळवण्यासाठी जितू मुंडा वारंवार बँकेत जात होते.

मात्र, अशिक्षित असल्यामुळे त्यांना आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेची माहिती नव्हती. जितू यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी बँक अधिकाऱ्यांना मृत्यूची माहिती दिली होती, तरीही अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र सादर करण्याची किंवा खातेदाराला प्रत्यक्ष उपस्थित करण्याची अट घातली.

या अटींमुळे निराश झालेल्या जितू यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी स्मशानभूमीत जाऊन बहिणीची कबर उकरली आणि तिचा सांगाडा गोणीत भरून थेट बँकेत आणला. हा प्रकार पाहताच बँकेत एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, जितू यांना कायदेशीर प्रक्रियेची माहिती नव्हती आणि बँक कर्मचाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शनही मिळाले नाही. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सांगाडा पुन्हा सन्मानपूर्वक दफन करण्यात आला.

दरम्यान, स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित बँक अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. कायदेशीर अडचणी असूनही, जितू मुंडा यांना लवकरात लवकर पैसे मिळावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही घटना केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नसून, व्यवस्थेतील त्रुटी आणि असंवेदनशीलतेचे गंभीर उदाहरण ठरत आहे.----------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande