प.बंगाल: मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार; भाजप-टीएमसी समर्थकांमध्ये संघर्ष
कोलकाता , 29 एप्रिल (हिं.स.)। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान नादिया, हावडा आणि दक्षिण २४ परगणा यांसह अनेक ठिकाणी हिंसक झटापटी झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण २४ परगण्यातील बसंती भागात भाजप उमेदवार विका
प.बंगाल: मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार; भाजप-टीएमसी समर्थकांमध्ये संघर्ष


कोलकाता , 29 एप्रिल (हिं.स.)। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान नादिया, हावडा आणि दक्षिण २४ परगणा यांसह अनेक ठिकाणी हिंसक झटापटी झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण २४ परगण्यातील बसंती भागात भाजप उमेदवार विकास सरदार यांच्यावर हल्ला करण्यात आला, तर पानिहाटी येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे.

माहितीनुसार, बसंती येथे भाजप उमेदवारांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना बूथ क्रमांक ७६ वर घडली. भाजप उमेदवार विकास सरदार हे मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर कथितपणे हल्ला करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, ते मतदान केंद्राची पाहणी करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

दरम्यान, हुगळी जिल्ह्यातील रामचंद्रपूर येथील बूथ क्रमांक १४७ वर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) समर्थकांमध्ये झटापट झाली. बनावट मतदान प्रतिनिधी नियुक्त केल्याच्या आरोपांमुळे तणाव वाढल्यानंतर हा वाद उफाळल्याचे सांगितले जात आहे.या घटनेदरम्यान विकास सरदार यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. त्यांच्या सुरक्षारक्षकांकडील शस्त्रे हिसकावून घेण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. केंद्रीय सुरक्षा दल उपस्थित असूनही त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी किंवा बचावासाठी कोणताही हस्तक्षेप केला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरातील तणाव आणखी वाढला आहे.

हुगळी-चुचुडा भागात रस्त्याच्या कडेला लावलेले तृणमूल काँग्रेसचे अनेक निवडणूक बॅनर हटवण्यात आल्याने वाद निर्माण झाला. तसेच बूथ क्रमांक २७, २८ आणि २९ वर मतदार याद्या फाडल्याच्या आरोपावरूनही गोंधळ झाला. कथितपणे केंद्रीय दलाच्या काही जवानांना तृणमूलचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी तेथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय, पानिहाटी विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक १४५ वर भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. मतदानादरम्यान हा संघर्ष बराच वेळ सुरू होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande