
रायगड, 03 एप्रिल (हिं.स.) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने २०२५–२०२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत एका वर्षात तब्बल ३०६ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय नोंदवला आहे. यामुळे संस्थेचा एकूण व्यवसाय १०५९ कोटी रुपयांवर पोहोचला असून, ३०० कोटींपेक्षा अधिक वार्षिक व्यवसाय करणारी रायगड जिल्ह्यातील पहिली पतसंस्था ठरली आहे.
संस्थेचा निव्वळ नफा ९ कोटी २५ लाख रुपये झाला असून, तो मागील वर्षाच्या तुलनेत १ कोटी ७४ लाख रुपयांनी वाढला आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीनंतरही संस्थेचा एनपीए शून्य टक्के राहिला आहे. यामुळे संस्थेची आर्थिक शिस्त आणि कर्जवसुलीची काटेकोर अंमलबजावणी अधोरेखित झाली आहे, अशी माहिती संस्थापक सुरेश पाटील आणि अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.
संस्थेच्या ठेवी ५९६ कोटी ८८ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या असून, कर्जवाटप ४६२ कोटी ३२ लाख रुपये झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये १६२ कोटी २२ लाख रुपयांची वाढ झाली असून, कर्जवाटपातही लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
आदर्श पतसंस्थेचे कार्यक्षेत्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये विस्तारले आहे. संस्थेच्या एकूण २२ शाखा कार्यरत असून, नागडोंगरी-चेंढरे येथे स्वतंत्र गोल्ड लोन विभाग सुरू करण्यात आला आहे. तसेच, पुण्यातील सरस्वती पतसंस्थेचे यशस्वी विलीनीकरण करण्यात आले आहे.
उत्तम ग्राहक सेवा, पारदर्शक व्यवहार आणि कर्जवसुलीतील शिस्त यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत असल्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी नमूद केले. भविष्यातही ही प्रगती कायम ठेवण्याचा संस्थेचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)