
अकोला, 03 एप्रिल (हिं.स.) : नागपूर येथे आयोजित ६९व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटच्या समारोप समारंभात अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा 'प्रोजेक्ट त्रिनेत्र' साठी विशेष सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचे हस्ते, तसेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अति. पोलीस महासंचालक (सी.आय.डी.) सुनील रामानंद यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
६९व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट (AIPDM) २०२५-२६ अंतर्गत आयोजित संगणक जागरूकता स्पर्धेतील इव्हेंट-IV मध्ये महाराष्ट्राला 'माहिती तंत्रज्ञानाने पोलीसांना सक्षम करण्यासाठी एनसीआरबीची रनिंग ट्रॉफी' प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रोजेक्ट त्रिनेत्र या अभिनव आयटी प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवडण्यात आले.
या प्रकल्पाच्या यशामध्ये अकोला पोलीस दलाचा महत्त्वपूर्ण सहभाग असून, प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल विशेष सन्मान मिळाला. प्रकल्पाचे सादरीकरण पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी एनसीआरबी मुख्यालय, नवी दिल्ली येथे केले.
अकोला येथील युवा उद्योजक किसन पनपालिया यांनी प्रकल्पात मोलाचे योगदान दिले आहे. प्रोजेक्ट त्रिनेत्र आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे प्रतिबंध, गुन्हेगारांची ओळख पटविणे, तसेच पोलीस कार्यक्षमता वाढविण्यासाठी विकसित करण्यात आलेला उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ झाली असून पोलीस सेवांमध्ये पारदर्शकता आणि गतिमानता निर्माण झाली आहे.
गेल्या ६ महिन्यात प्रोजेक्ट त्रिनेत्रच्या माध्यमातून सराईत गुन्हेगारांच्या गुन्ह्यांमध्ये ४८% घट नोंदवली गेली आहे. अकोला पोलीस दलाच्या या कामगिरीमुळे जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे