
अकोला, 03 एप्रिल (हिं.स.)। मानवतेच्या कल्याणासाठी आणि शांततेचा संदेश देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेल्या बलिदानाचा दिवस, म्हणजेच 'गुड फ्रायडे' अकोल्यात अत्यंत भक्तिभावाने पाळण्यात आला. अकोला शहरातील प्रसिद्ध माऊंट कार्मेल चर्चमध्ये या निमित्त विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांना सुळावर चढविण्याच्या ऐतिहासिक घटनेचा सादर करण्यात आलेला 'जिवंत देखावा'. या हृदयद्रावक प्रसंगाचे हुबेहूब सादरीकरण करण्यात आल्याने उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले होते. येशूंनी सोसलेल्या वेदना आणि त्यांचा क्षमाशील स्वभाव या देखाव्याच्या माध्यमातून जिवंत करण्यात आला. सकाळपासूनच चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी चर्चमध्ये विशेष 'क्रॉसची वाट' (Way of the Cross) ही भक्ती करण्यात आली. येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या पापांसाठी स्वतःचे बलिदान दिले, हा संदेश यावेळी धर्मगुरूंनी दिला. शांतता, प्रेम आणि क्षमा हीच येशूंची खरी शिकवण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या जिवंत देखाव्यामुळे तरुण पिढीला येशूंच्या त्यागाची महती समजण्यास मदत झाली. दुपारच्या वेळी येशूंनी क्रूसावर प्राण त्यागले, त्या स्मृतीप्रित्यर्थ चर्चमध्ये शांतता पाळत विशेष प्रार्थना करण्यात आली.या कार्यक्रमाला अकोला शहर आणि परिसरातील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे